You are currently viewing साटेली-भेडशी परमे रस्त्यावर झाड कोसळून तीन वीज खांब जमीनदोस्त; वीजपुरवठा ठप्प

साटेली-भेडशी परमे रस्त्यावर झाड कोसळून तीन वीज खांब जमीनदोस्त; वीजपुरवठा ठप्प

साटेली-भेडशी परमे रस्त्यावर झाड कोसळून तीन वीज खांब जमीनदोस्त; वीजपुरवठा ठप्प

आणखी तीन खांबांना तडे; दोन दिवसांपासूनच्या खंडित वीजपुरवठ्याने नागरिक संतप्त, सरपंच छाया धर्णे यांनी केली घटनास्थळी पाहणी

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी परमे रस्त्यावर रविवारी सायंकाळी भलेमोठे झाड कोसळल्याने महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. झाड थेट वीज वाहिनीवर पडल्याने तीन वीज खांब मुळासकट जमिनीवर कोसळले, तर अन्य तीन खांबांना तडे गेले आहेत. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आधीच त्रस्त होते. त्यातच झाड कोसळून वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने वीज संकट अधिकच गंभीर बनले असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच साटेली ग्रामपंचायतीच्या सरपंच छाया धर्णे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाड हटविणे, बाधित वीज खांब बदलणे आणि वीजवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.
सध्या वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्याची गरज असून महावितरणने तातडीने कार्यवाही करून परिसरातील अखंड वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा