मध्यान्ह भोजन धान्य अपहार प्रकरणात मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी – चंद्रशेखर शिवराम जोशी यांची कुडाळ पोलिसांकडे तक्रार;
माणगाव येथील विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; सीसीटीव्ही फुटेजसह पुरावे सादर
कुडाळ :
माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगाव संचलित श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील मुख्याध्यापक संजय सदाशिव पिळणकर यांनी शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नधान्याचा अपहार करून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माजी सैनिक व संस्थेचे संचालक चंद्रशेखर शिवराम जोशी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, विद्यार्थ्यांना नियमानुसार व पाककृती निवड समितीच्या सूचनांनुसार पोषण आहार दिला जात नसून, एमडीएम रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. तसेच शाळेसाठी आलेले धान्य बाहेरील व्यक्तींना विक्री केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पुरावा म्हणून दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजीचे शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्टॉक रजिस्टर व एमडीएम नोंदीतील तफावत दर्शवणारे फोटो, तसेच अन्य कागदपत्रे पोलीसांकडे सादर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदारांनी सीसीटीव्ही फुटेजचा पेन ड्राइव्हही पोलीसांकडे दिला आहे.
दरम्यान, शाळेमध्ये सध्या एमडीएम योजनेतील जादा धान्यसाठा उपलब्ध असून भविष्यात त्याचीही विक्री होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या पोषण आहारापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत संबंधित मुख्याध्यापकांवर फसवणूक, अपहार व विश्वासघात यांसारख्या कलमान्वये कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
