You are currently viewing कावळ्याचा.. शाप….!

कावळ्याचा.. शाप….!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कावळ्याचा.. शाप….!*

 

तुम्हाला घास भरवतांना

आईला एकच प्रश्न

तुम्ही हजारदा विचारायचा

आई.. न कंटाळता

प्रश्नांना उत्तर द्यायची

आज तुमची म्हातारी आई

एकच प्रश्न अनेकदा विचारते

तर तुम्ही तिच्यावर

कां… ओरडता ..

तिला कां घालून पाडून बोलता

तिच्या म्हातारपणावर कां खेकसता

तिच्याच घरात.. तिचाअपमान करता

 

जिवंत म्हाता-या आई बापाला

प्रेमाने घास भरवला असता तर

मेल्यावर श्राद्धाचं जेवण घालायची

गरजच नव्हती …

अशी नाती मिरवण्याची आजही

गरज नव्हती.. फिक्या रडण्याला ओल नव्हती ..

कां भरलेल ताट पितृपंधरवड्याला

कावळया पुढे ठेवता ..

कावळा शिवणार नाही

अश्या ताटाला ..

कावळयाचा शाप आहे तुम्हाला

स्वतः ही खाणार नाही

आणि तुमच्या पितरांना ही तो

खाऊ देणार नाही ….!!

 

देह उभा कवटाळून

एक हाक उठते..बाळा..तू हवास

कावळ्याला ती ऐकू येत नाही

सुक्या मायेत दाटणं

कावळ्याला..मान्य नाही

शाप आहे माझा…

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा