You are currently viewing नको आत्महत्या हवे आत्मचिंतन

नको आत्महत्या हवे आत्मचिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*नको आत्महत्या हवे आत्मचिंतन*

 

 

माझाच एक अनुभव सांगते. अगदी जसं घडलं तसं. एकही अक्षर इकडे तिकडे नाही.

 

लहानही नव्हते मोठीही नव्हते. अजाण नव्हते पण सुजाणही नव्हते. झालं असं, मला हिंदी विषयात खूपच कमी गुण मिळाले. जेमतेम उत्तीर्ण होण्याइतकेच. परिणामी मला वर्गात सतत मिळणारा पहिला नंबर हुकला. खूपच खाली गेले मी. नेहमी वर्गमैत्रिणींच्या केंद्रस्थानी असलेली मी पार कोपऱ्यात गेले. त्या जागी आता दुसरंच कोणीतरी होतं. हेही खूप मोठं अपयश वाटलं मला. मानहानी वाटली. प्रचंड नैराश्य आलं. उदास झाले. आता इथून पुढे आपण आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही अशीच भावना झाली. माझे डोळे पाण्याने भरले, मोठ्याने रडावसं वाटलं.

 

संध्याकाळी वडील घरी आल्यावर मी त्यांना सांगूनच टाकलं, “आता मला मरून जावसं वाटतंय, यापुढे मी काहीच करू शकणार नाही. हे आयुष्य संपवूनच टाकते मी आता.”

 

वडिलांचे मोठे, तेजस्वी डोळे. त्या नजरेतून त्यांनी माझ्याकडे पाहिलं, माझे हात हातात घेऊन म्हणाले,

 

” ये. बैस, बोलु आपण.”

माझे वडील विद्वान, व्यासंगी, महान चिंतक. त्यांची प्रवचने आम्ही नेहमीच ऐकायचो. पण त्या दिवशी मला त्यांचं काहीही ऐकायची मानसिकता नव्हती. पण तरीही मी त्यांचा हात धरला. ते म्हणाले,

” हे बघ बाबी, मरण्यापेक्षा जगणं महत्त्वाचं असतं आणि आपल्या भोवती एक ईश्वर शक्ती असते ती आपल्या जीवनावर राज्य करत असते. त्या शक्तीच्या विरोधात जाऊन आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर मुक्ती मिळत नाही. हे बघ! आत्महत्या करणे म्हणजे त्या शक्तीच्या विरोधात जाणे आणि आत्महत्या करणारा माणूस इथलं आयुष्य संपवू शकतो मात्र जितके श्वास देऊन त्या भगवंतांने आपल्याला जन्माला घातलेलं असतं ते श्वास घ्यावेच लागतात. आत्महत्या करणारी व्यक्ती या जगातून नाहीशी होते. मात्र जिथे कुठे जाते तिथे रोज त्याच वेळी, त्याच प्रकाराने, दिलेले श्वास संपेपर्यंत रोज आत्महत्या करते, रोज मरते आणि रोज त्याच त्याच वेदना सहन करत राहते. पण हे पारलौकिक सत्य त्याला नंतर उमगतं आणि पश्चात्तापाची वेळ निघून गेलेली असते.”

 

वडील सांगत होते ते अतींद्रिय शास्त्र होते. त्यावर मी का विश्वास ठेवावा? पण नंतर ते म्हणाले,

” मरून जाण्याचा विचारच मुळात मनात येणं म्हणजे कमकुवतपणा आहे. शिवाय तुला फक्त यशाची हाव आहे आणि अपयशाची भीती वाटते ना? अगं त्यापेक्षा अपयशालाही सामोरी जा. हिंदी ही किती सुरेख भाषा आहे! अधिक सखोलपणे अभ्यास कर. असं करूया का? उद्यापासून आपण दोघे मिळून हिंदी पुस्तके वाचूया. प्रेमचंद मुंशी, कबीरदास, मैथिलीशरण गुप्त आणि कितीतरी.जे येतं त्यापेक्षा येत नाही त्याकडे लक्ष दे ना. नक्की जमेल तुला.”

आज जेव्हा मी या घटनेकडे मागे वळून पाहते तेव्हा अनेक गोष्टी माझ्या लक्षात येतात. अनेक प्रश्न उभे राहतात. जर त्या दिवशी माझ्या वडिलांनी माझं बोलणं हे केवळ पोरकटपणा किंवा तात्पुरतं अथवा वेडेपणाच आहे असं मानून दुर्लक्ष केलं असतं तर? काहीही असो, पण माझ्या मनात निर्माण झालेल्या या मूर्ख भावनांची हेटाळणी केली असती तर? पण तसं न करता त्यांनी एक गंभीर प्रश्न समजून अत्यंत मृदू पणे मला आलेलं नैराश्य, निमित्त कितीही साधं असू दे पण माझा ढळत चाललेला आत्मविश्वास सावरण्याचा प्रयत्न केला. *जमेल तुला* या दोनच शब्दात त्यांनी किती विश्वास दिला मला!

आणि त्यानंतर आजपर्यंत आयुष्य जगत असताना, संकटाचे, अपयशाचे, मानहानीचे, खच्चीकरणाचे, नैराश्याचे अनेक दगड मी लीलया उचलले. कधीही जीवन संपवण्याचा विचारही माझ्या मनात आला नाही. ते संपेल तेव्हा संपेल. आता मनापासून वाटतं माझे वडील माझी हेल्पलाइन होते आणि त्यानंतर मी ही अशाच प्रकारची हेल्पलाइन इतरांसाठी बनण्याचा प्रयत्न करत राहिले.

 

आज जगभरात दरवर्षी सात लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. पण ही एक गंभीर समस्या आहे, ही दुर्लक्ष करून चालणार नाही. युद्ध आणि दहशतवाद यापेक्षाही आत्महत्या हा जगासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्महत्येची वृत्तं आपण वाचतो. सुशांत सिंग, जिया खान, भय्यूजी महाराज, नितीन देसाई अशा काही सेलिब्रेटींच्या आत्महत्यांची चर्चा होते. हळहळ व्यक्त केली जाते आणि काही दिवसांनी तो विषय विस्मरणातही जातो. मात्र सातत्याने होत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सध्या मराठा आरक्षणाच्या आग्रहापैकी होणाऱ्या आत्महत्या, प्रेमभंगातून झालेल्या तरुणांच्या आत्महत्या, परीक्षेतील अपयशामुळे, मानहानीमुळे किंवा एकंदरच आयुष्याची गणितं चुकल्यामुळे सतत होत असणाऱ्या आत्महत्या, तरुणांच्या वृद्धांच्या, हा एक कौटुंबिक तसाच सामाजिक दृष्टीने खरोखरच गंभीर प्रश्न आहे.

 

आत्महत्येची कारणे कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, वैज्ञानिक, मानसिक अशी विविध प्रकारची असू शकतात. प्रामुख्याने डिप्रेशन किंवा नैराश्य, मानसिक स्थितीत चढ-उतार, सतत चिंता किंवा अस्वस्थता, ज्या गोष्टीत आनंद वाटत होता त्यात नंतर रस न वाटणे, मनात वाहणारे नकारात्मक विचार, भविष्याबद्दलच्या निगेटिव्ह कल्पना आणि कसलं तरी सतत भय— हे सार आत्महत्येस प्रवृत्त करणार ठरतं.

 

मग यातून मार्ग काय? यासाठी द्विस्तरीय मार्ग असू शकतात. पहिला म्हणजे आत्महत्येचा विचार मनात आला तर काय करावे आणि दुसरा म्हणजे नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती काही *वॉर्निंग साईन्स* देतात, धोक्याच्या सूचना देतात. त्या टिपण्याची जबाबदारी त्याच्या भोवतालच्या माणसांची म्हणजेच कुटुंबीयांची, मित्र-मैत्रिणींची शेजाऱ्यांची पर्यायाने समाजाचीच. ती त्यांनी गांभीर्याने घेतली पाहिजे आणि ,”बाबा रे! तुझा जीव लाखमोलाचा आहे कशाला आत्महत्येचा विचार करतोस?” हे पटवून दिलं पाहिजे.

 

 

तसेच आत्महत्येचा विचार डोक्यात आल्यापासून त्या व्यक्तीने सुद्धा स्वतः जागरूक राहण्याचा प्रयत्न केला तरीही मन परिवर्तन घडू शकते. अशावेळी मानसिक आधाराची गरज भासू शकते आणि जवळच्या जिवाभावाच्या व्यक्तीकडून तो आधार नि:संकोचपणे त्याने घ्यावा. संवादात शक्ती असते. संवाद साधावा. समुपदेशकाची मदत घ्यावी. शिवाय अनेक सेवाभावी online हेल्पलाईन्स केवळ या विषयांतर्गत आज उपलब्ध आहेत. त्याचाही आधार घ्यावा. असे समजावे की हे एक प्रकारचे *मनाचे प्रतिबंधक लसीकरण* आहे.

 

आज कालच समाजात आत्महत्येचे प्रमाण का वाढले आहे? काही ठळक कारणं म्हणजे वाढत्या स्पर्धा, भौतिकता, भोगवाद, चंगळवाद. एकीकडे हे दृश्य असताना दुसरीकडे महागाई, बेकारी, दारिद्र्य, फसवणूक, अपेक्षाभंग, नैसर्गिक आपत्ती अशा सहस्त्रावधी कारणांच्या विळख्यात माणूस सापडतो. पण या सर्वांच्या मुळापाशी जाऊन विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की बर्‍याचदा आत्महत्या करणारा माणूस मृगजळापाठी धावत असतो. आणि आयुष्याची चुकीची गणितं मांडत राहतो. कुठलीही भरारी घेताना प्रथम स्वपंखातलं बळ जाणावं हे साधं तत्वही विसरतो आणि मग नैराश्याच्या गर्तेत जातो. नेमकं हे ओळखावं. कुठे थांबावं याचं भान ठेवावं.

 

आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी “थांबला तो संपला म्हणण्यापेक्षा “आता तू जरा थांब अधिक रचनात्मक विचार करून मागे फिर. तमा कडून प्रकाशाकडे जगण्याची वाट तुला नक्की सापडेल—” या अर्थाचा मंत्र त्यांनी जपावा. मिळालेला मनुष्य जन्म किती मोलाचा आहे हे प्रथम त्यांनी ओळखावं.

 

शेतकऱ्यांची आत्महत्या हा तर अत्यंत करुण विषय आहे. आस्मानी सुलतानी मुळे होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी खरोखरच अनेक स्वयंसेवी संघटना खूप काम करत आहेत. पाणी फाउंडेशन, नाम वगैरे सारख्या संस्थांच्या कार्यात दुष्काळग्रस्तांनी डोळसपणे भाग घेतला, अधिक विचारांची जोड दिली तर आजचे संकट भविष्यात न राहण्याची शक्यता नाही का बळवणार? थोडक्यात, “कशाला करता विचार आत्महत्येचा? THIS IS NOT THE END OF LIFE .MAYBE THERE IS MUCH BETTER LIFE AHEAD.म्हणून जगा.विचार करा सकारात्मकतेचा, स्वसामर्थ्याचा, स्वबळावरच्या विश्वासाचा. शिवाय आत्महत्या हा एकआत्मकेंद्री विचार आहे. “तुमचं तुमच्या परिवारावर नितांत प्रेम आहे ना? त्यांचंही तुमच्यावर तितकच प्रेम आहे. मग असा विचार करा की तुमच्या मागे तुमच्याशिवाय ते कसे जीवन जगतील? तुमचा फक्त तुमच्या जगण्यावर अधिकार आहे, मरण्यावर नाही हेही लक्षात ठेवा.

 

जाता जाता एक असाच अनुभव सांगते. मी बँकेत नोकरी करत असताना माझ्या एका मैत्रिणीवर, पतीला धंद्यात बसलेल्या प्रचंड आर्थिक फटक्याला सामोरं जाण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी तिचा संपूर्ण पगार केवळ कर्जापोटी खर्च होत होता. अत्यंत दुर्धार असा प्रसंग होता. भयानक आर्थिक कोंडी होत होती तिची. पण तरीही ती शांत असायची. एक दिवस मी सहज तिला म्हटलं,” तुला काही मदत हवी आहे का?” तेव्हां ती एव्हढंच म्हणाली,

” आता जे काही करायचं ते गजानन महाराजच करतील.”

मी बुद्धीवादी आहे पण खरं सांगू त्यावेळी मला असं वाटलंच नाही की ही तिची अंधश्रद्धा होती. उलट ते श्रद्धेचं, विश्वासाचं बळ होतं याची मला जाणीव झाली.त्या आधारावर तिने तिच्या पतीला ,लहान मुलांना धीरानं सांभाळलं. जणू त्यांची शक्ती ती बनली.

 

आज ईश्वरवाद हा केवळ प्रदर्शनीय झालाय. कुठेतरी अंतर्यामीचा त्या शक्ती विषयीचा विश्वास हरवलाय आणि नेमकं हेच तपासलं पाहिजे. या शक्तीचा अभ्यास केला पाहिजे. नुकताच नवरात्र उत्सव साजरा झाला. गरबा, दांडीया झाल्या, भोंडला झाला, आरत्या झाल्या,जोगवे झाले. पण मंडळी,” म्हणजे उत्सव झाला का?” हा शक्तीचा ऊत्सव आहे,ही बळाची पूजा आहे. ते बळ मनात सतत सळसळूदे! आत्महत्या करण्यापेक्षा आत्मचिंतन,आत्मबळ अधिक महत्त्वाचं नाही का ?

 

राधिका भांडारकर पुणे.

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + two =