आमदार दीपक केसरकर यांची मोठी घोषणा
सावंतवाडी क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ७ कोटी मंजूर; सेमी ऑलिम्पिक ट्रॅक, स्विमिंग पूलसह आधुनिक सुविधा उभारणार
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्या क्रीडा संकुलासाठी इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या सुविधांसाठी अतिरिक्त सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या क्रीडा संकुलात सेमी ऑलिम्पिक ट्रॅक, अॅथलेटिक्स मैदान तसेच ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या नावाने क्रिकेटची ड्रेसिंग रूम उभारण्यात येणार आहे. याशिवाय कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल खेळांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. खेळाडूंना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्विमिंग पूलचाही समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदपूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील खेळाडूंनाही मिळणार दर्जेदार सुविधा
वेंगुर्ला आणि बांदा येथे अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली असून दोडामार्गमध्येही क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नगरपालिकेमार्फत हे परिपूर्ण क्रीडा संकुल उभे केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी लखमराजे भोसले, आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा इंगवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नगरपरिषदेचे अभियंता तुषार सरडे, उपअभियंता सीमा गोवेकर, अर्चित पोकळे आणि प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.
