नऊ दिवस, नऊ रंग आणि महिला – बालकल्याणाच्या विविध योजनांची माहिती
सिंधुदुर्ग: शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘नवदुर्गा’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ वेगवेगळ्या रंगांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याणाशी संबंधित महत्त्वाचे कायदे, योजना आणि मदत यंत्रणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून मुलींचे संरक्षण व शिक्षण, मातृत्व लाभ, बालकांचे हक्क, महिलांची कार्यस्थळावरील सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण आणि संकटग्रस्त महिला व बालकांसाठी उपलब्ध मदत यंत्रणा अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यासोबतच आवश्यकतेच्या वेळी मदत कुठे आणि कशी मिळवावी, याचीही माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.
उपक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनातून मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सन्मान यांचा संदेश देण्यात येत आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, स्त्रीभ्रूणहत्येला प्रतिबंध करणे, बालविवाह रोखणे आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, हे या अभियानाचे महत्त्वाचे उद्देश आहेत.
मुलींचा जन्म आनंदाने स्वीकारणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित व सन्मानपूर्ण वातावरण निर्माण करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. या दृष्टीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, तिसऱ्या दिवशी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पॉक्सो), अनाथ प्रमाणपत्र आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, चौथ्या दिवशी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३, तर पाचव्या दिवशी हेल्पलाइन क्रमांक आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देण्यात येणार आहे.
सहाव्या दिवशी सखी वन स्टॉप सेंटर, सातव्या दिवशी शासकीय अंकुर महिला वसतिगृह आणि बालगृह, आठव्या दिवशी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ व हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१, तर नवव्या दिवशी लेक लाडकी योजनेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
या नऊ दिवसांच्या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ महिला अधिकारी मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. प्रत्येक दिवसाच्या विषयानुसार संबंधित योजनांची माहिती, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध मदत यंत्रणांविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
नवरात्रीतील देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देत महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देणे, तसेच प्रत्येक बालकाला संरक्षण आणि विकासाची संधी उपलब्ध करून देणे, हा ‘नवदुर्गा’ उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. शासनाच्या योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून महिला व बालकल्याणाच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
०००००
दिवस पहिला
*बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेतून मुलींचे संरक्षण व शिक्षणाला प्रोत्साहन द्या — जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. नवरात्रोत्सवातील आजच्या नारंगी रंगाच्या अनुषंगाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मोहिमेची माहिती देण्यात आली. मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण मोहीम असून, मुलींचे संरक्षण, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे तसेच शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम बनविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. या मोहिमेची सुरुवात २२ जानेवारी २०१५ रोजी करण्यात आली. देशातील घटते बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि समाजामध्ये मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, हे या मोहिमेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
स्त्री भ्रूणहत्या रोखणे, बेकायदेशीर लिंगनिदान चाचण्यांना प्रतिबंध करणे, मुलींच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि त्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात येतो. तसेच मुलींना शालेय व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.
समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता मुलींना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाहाला प्रतिबंध करणे तसेच मुलींच्या सुरक्षितता आणि सन्मानाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
