दोडामार्ग तालुक्यात पावसाचे थैमान; झरेबाबर-साईनगर परिसर तीन दिवसांपासून अंधारात
तिलारी-घोटगे परिसरात झाडे कोसळली; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वीज कडकडाटामुळे मोठे नुकसान झाले असून तिलारी, घोटगे तसेच झरेबाबर (साईनगर) परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे.
झरेबाबर (साईनगर) परिसरात पावसादरम्यान घनश्याम पारधी यांच्या घरासमोर असलेले फणसाचे मोठे झाड विद्युत तारांवर कोसळल्याने संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेला तब्बल तीन दिवस उलटूनही वीज वितरण विभागाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करून पडलेले झाड हटवले तसेच तारा बाजूला केल्या, मात्र अद्यापही तुटलेल्या तारांची जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील दहा कुटुंबे तीन दिवसांपासून अंधारात आहेत.
‘श्रीमंत तुपाशी आणि गरीब उपाशी’ — ग्रामस्थांचा संताप
ग्रामस्थांच्या मते, ज्या ठिकाणी झाड पडून वीजपुरवठा खंडित झाला होता, त्याच भागातील एका क्रशरचा वीजपुरवठा मात्र तातडीने सुरू करण्यात आला. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. “श्रीमंत तुपाशी आणि गरीब उपाशी” अशीच भूमिका वीज मंडळाची असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अधिकारी-वायरमनमध्ये टोलवाटोलवी
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ सातत्याने संपर्क साधत असले तरी अधिकारी आणि वायरमन यांच्यात जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. वायरमन अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात, तर अधिकारी वायरमनला सूचना दिल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
लग्नसराईत अंधार; पाणीपुरवठाही ठप्प
सध्या वाडीमध्ये लग्नसराईचे वातावरण असून हळदी व लग्नकार्याची तयारी सुरू आहे. मात्र विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जेवण बनवण्यापासून पाहुण्यांच्या सोयीपर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुभ कार्यात अंधाराचे सावट पसरल्याने ग्रामस्थांनी वीज वितरण विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, तातडीने वीजपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
