कुडाळात विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिर
शहर शिवसेनेकडून ६ व ७ मे रोजी आयोजन; विविध शैक्षणिक दाखले मिळणार
कुडाळ
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांसाठी ६ व ७ मे रोजी मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महायुती कार्यालय, पोस्ट कार्यालयासमोर येथे पार पडणार असल्याची माहिती शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी दिली आहे.
दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. विद्यार्थ्यांना हे दाखले सुलभ आणि मोफत उपलब्ध व्हावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, वय अधिवास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तसेच अल्पभूधारक दाखला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.
