दरडोई उत्पन्न वाढीसाठी बँकेचे योगदान महत्त्वाचे; मनीष दळवीं सारखे अभ्यासू नेतृत्व जिल्हा बँकेला राणेसाहेबांनी दिले त्यांचे आभार – प्रमोद कामत
ठेवीदारांचा विश्वासच बँकेची खरी ताकद – मनीष दळवी
वेंगुर्ला / (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मठ शाखेचा नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न झाला. नव्या शाखा इमारतीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रमोद कामत यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या लहान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेने ७००० कोटींचा व्यवसाय पूर्ण करणे ही मोठी व कौतुकास्पद कामगिरी आहे. बँकेच्या ठेवींमध्ये झालेली वाढ ही ग्राहकांचा आणि जिल्हावासियांचा बँकेवरील दृढ विश्वास दर्शवते. राणेसाहेबांनी अभ्यासू व सक्षम नेतृत्व म्हणून मनीष दळवी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेतील कर्मचारी अधिक आपुलकीने व विश्वासाने सेवा देत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी जिल्हा बँकेचे योगदान महत्त्वाचे असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यास जि.प. सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, मठ सरपंच श्रीम. रूपाली नाईक, उपसरपंच सोनाली मठकर, मठ विविध सोसायटीचे चेअरमन सुभाष बोवलेकर, श्री देव स्वयंभू देवस्थान समिती मठ अध्यक्ष मनोहर गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
📌 बँकेच्या प्रगतीचा वेग १७% च्या पुढे – मनीष दळवी
यावेळी मनीष दळवी यांनी सांगितले की, शून्यातून सुरू झालेल्या मठ शाखेकडे आज १६ वर्षांनंतर सुमारे ९ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. मागील एका वर्षातच १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ठेवीदारांनी बँकेच्या सेवांवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. बँकेच्या उलाढालीचा वेग यापूर्वी १२ ते १४ टक्क्यांच्या दरम्यान होता; मात्र यावर्षी हा वेग १७% पेक्षा अधिक झाला आहे, ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठेवीदारांचा विश्वास टिकवण्यासाठी बँकेचा कारभार पारदर्शक असणे आवश्यक आहे, यावर राणेसाहेब नेहमी आग्रही राहिले आहेत. जिल्हा बँकेचा नफा वाढेल तसतसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, या भूमिकेतून आम्ही संचालक मंडळ काम करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, ठेवीदार व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक के. बी. वरक, मठ शाखा व्यवस्थापक सागर परब, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर, विकास अधिकारी विवेकानंद बागलकर, जिल्हा बँकेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच मठ गावातील ग्रामस्थ, ग्राहक व ठेवीदार मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.
