उद्घाटनानंतर अवघ्या चार दिवसांत कारवाई; अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांची माहिती, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
कुडाळ : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते १७ जून रोजी मोठ्या गाजावाजात उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी धडक कारवाई केली.
स्टोअरकडे आवश्यक वैध FSSAI अन्न परवाना नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांना व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही माहिती कुडाळ-वेंगुर्ले विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अवघ्या चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या भव्य स्टोअरवर FDA ने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकल्याने कुडाळ शहरात एकच खळबळ उडाली. एका तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी सांगितले की, स्टोअरमध्ये अन्न व्यवसाय सुरू असताना आवश्यक आणि वैध FSSAI परवाना उपलब्ध नव्हता. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर अभय चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. गावित यांच्या पथकाने ‘आपला बाजार’ स्टोअरमध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीदरम्यान स्टोअरचे मालक श्री. नाईक उपस्थित नव्हते आणि त्यांनी व्यवसायासंदर्भातील संपूर्ण कागदपत्रांची माहितीही दिली नव्हती. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्टोअर मॅनेजर अमोल सुतार यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यावेळी अमोल सुतार यांच्या नावे अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 31 अन्वये व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ज्या अन्न व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक असते, अशा व्यवसायांना FDA कडून FSSAI चे ‘हँडल परवाना’ (State/Central Licence) घेणे बंधनकारक असते.
स्टोअर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार होती. असे असूनही आवश्यक परवाना घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू ठेवणे हा अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 31 नुसार गंभीर गुन्हा ठरत असून, कलम 63 नुसार तो शिक्षेस पात्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
FDA अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ ‘व्यवसाय बंद’ करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत वैध FSSAI परवाना प्राप्त होत नाही, तोपर्यंत संबंधित स्टोअर सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, केवळ परवान्याचाच मुद्दा नसून ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही खबरदारी घेत FDA पथकाने स्टोअरमधील काही खाद्यपदार्थांचे नमुने संशयावरून जप्त केले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, आता संबंधित स्टोअरला ऑनलाइन अर्ज करून FDA च्या वरिष्ठ कार्यालयाकडून आवश्यक मंजुरी मिळवावी लागेल. अर्जात किंवा स्टोअरमधील सुविधांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर कराव्या लागतील. संपूर्ण तपासणी पूर्ण होऊन वैध FSSAI परवाना मंजूर होईपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे.
तसेच भविष्यात ग्राहकांकडून कोणत्याही दुकानाबाबत तक्रार किंवा संशय व्यक्त झाल्यास अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अभय चंदनशिवे यांनी दिला.
FDA च्या या कारवाईमुळे कुडाळमधील अन्न व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परवाना आणि नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
