ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ५३ टक्के मतदान…
६ हजार ७५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; उद्या ठरणार उमेदवारांचे भवितव्य…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रकीया आज सर्वत्र शांततेत पार पडली जिल्ह्यातील एकूण १४ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या या प्रक्रियेत १२ हजार ७४३ मतदारांपैकी ६ हजार ७५३ मतदारांनी आपला हक्क बजावला.
संपूर्ण जिल्ह्यात एकूण ५२.९९ टक्के मतदानाची नोंद झाली असून प्रशासनाने हे मतदान भयमुक्त वातावरणात पार पडल्याचे जाहीर केले आहे.
थेट सरपंच पदासाठी ५ ग्रामपंचायतींमध्ये ११ उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये कुडाळ तालुक्यातील कालेली ग्रामपंचायतीत सर्वाधिक ५९.५१ टक्के मतदान झाले, तर सावंतवाडीतील माजगावमध्ये सर्वात कमी म्हणजेच ४०.१२ टक्के मतदान झाले. कणकवलीतील घोणसरी आणि मालवणमधील चौके येथेही मतदारांनी चांगला उत्साह दाखवला. सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ९ ग्रामपंचायतींमधील २३ उमेदवारांचे नशीब आता मतदान पेटीत बंद झाले असून, यामध्ये मालवणच्या वराड ग्रामपंचायतीत सर्वाधिक ७५.७३ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त झालेल्या जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरळीत चालली. कुठेही अनुचित प्रकार किंवा तांत्रिक बिघाड न झाल्याने जिल्हा प्रशासनाने मतदारांचे आभार मानले आहेत. आता सर्वांचे लक्ष बुधवार, २९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून सकाळी १० वाजल्यापासून संबंधित तहसीलदार कार्यालयात ही मोजणी सुरू होईल.
