ओसरगावात भाजपला धक्का; प्रदीप तळेकर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित
तंटामुक्ती अध्यक्ष, माजी उपसरपंच व सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व २३ जून रोजी करणार पक्षप्रवेश
ओसरगाव | प्रतिनिधी :
ओसरगावातील भाजपला मोठा धक्का मानला जात असताना गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिलेले प्रदीप तळेकर हे २३ जून रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख Vaibhav Naik यांच्या तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष Sushant Naik यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रदीप तळेकर हे ओसरगावातील अष्टपैलू व लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. तंटामुक्ती अध्यक्ष, माजी उपसरपंच आणि माजी सोसायटी चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच नामवंत भजनी बुवा म्हणून त्यांची ओळख असून विविध देवस्थानांच्या आर्थिक व्यवहारांचा प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे हिशोब सांभाळल्यामुळे त्यांच्याबद्दल गावकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण आहे.
गेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी बबली राणे यांच्या पत्नी सौ. चंदना राणे यांच्या प्रचारासाठी सक्रियपणे काम केले होते. तसेच मागील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित सरपंच निवडून आणण्यासाठीही त्यांनी मोठे परिश्रम घेतले होते. मात्र, गावातील कथित मनमानी कारभारामुळे त्यांनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ओसरगावात प्रदीप तळेकर यांना मानणारा मोठा समर्थक वर्ग असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा आगामी स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
