You are currently viewing सोज्वळता
Oplus_16908288

सोज्वळता

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी वि. ग. सातपुते यांच्या काव्याचे कवयित्री सौ.गौरी चिंतामणी काळे यांनी केलेलं रसग्रहण*

 

*सोज्वळता*

〰️〰️〰️〰️

हळव्या मनात माझिया

भावप्रितीचे शुभ्र चांदणे

भावपूर्ण अधीर अबोली

तानसेनी स्वरमुग्धी गाणे

 

शब्दस्वरात तूच सुगंधा

भावगीतात गंधर्व तराणे

मनसोक्त रमता एकांती

अधरी पाझरे सुरेल गाणे

 

दरवळतो बहावा मोगरा

प्रसन्नतेत तृप्तते जगणे

वृंदावनी तेवता फुलवाती

सोज्वळ विश्वरूप देखणे

〰️〰️〰️〰️〰️〰️

*वि.ग.सातपुते (भावकवी )*

दिनांक: 4 / 4 / 2026

📞*(9766544908)*

 

भावकवी आदरणीय वि.ग.सातपुते सरांची *सोज्वळता* ही रचना प्रसन्न तृप्त मनाने भावसमाधी लागलेल्या भक्ताच्या मनोवस्थेचे वर्णन करणारी एक सुंदर भावकविता आहे.

*सोज्वळता* अर्थात पवित्रता.आपल्या आराध्याच्या दर्शनाने मन पवित्र होते.पुन्हा पुन्हा भेटण्याची ओढ लागते.हळव्या मनाला तोच ध्यास लागतो व ते आत्ममुग्ध व तल्लीन होते.

आदरणीय अप्पा म्हणतात कि माझ्या मनात ईश्वर भेटीची अनामिक ओढ निर्माण झाली आहे. अध्यात्माचा दीप प्रज्वलित झाला आहे.

*भावप्रितीचे शुभ्र चांदणे* माझ्या मनभर पसरले आहे.हे कैवल्याचे चांदणे अर्थात मोक्षाचे द्वार आहे.ती वाट आता हळूहळू दृष्टीपथात येत आहे.दूरवरुन श्रीहरीच्या बासरीचे सुमधूर स्वर ऐकू येत आहेत.मनातच परमात्म्याशी शब्दांविना अर्थात

*भावपूर्ण अधीर अबोली* संवाद सुरु आहे.

आदरणीय विगसा अप्पांनी या प्रेममय भावावस्थेचे सुरेख वर्णन केले आहे.जसा एक प्रियकर आपल्या प्रेयसीच्या प्रेमात भावुक होतो..भेटीची अधीरता..अनामिक हुरहूर असते.खूप काही बोलायचे असते पण प्रीत अबोल होते,निःशब्दी संवाद सुरु होतो.मनात सुरेल संगीत उमटत असते व मन मंत्रमुग्ध होते.

कविवर्य येथे भक्तीभावाला *भावप्रितीचे शुभ्र चांदणे* ही उपमा देतात.

*शब्दस्वरात तूच सुगंधा*

*भावगीतात गंधर्व तराणे*

पहा किती सुंदर शब्दांत व्यक्त झाले आहेत कविवर्य.

आदरणीय वि.ग. सातपुते सर म्हणतात कि हे ईश्वरा ! माझ्या शब्दांत,प्रत्येक रचनेत तुझा अलौकिक सुगंध भरुन राहिला आहे. प्रत्येक गीतामध्ये तीच स्वर्गीय अनुभूती आहे.माझ्या अंतरी तूच कस्तुरी सम दरवळत आहेस व तुझे स्तुती गायन करताना स्वर्गीय सुख लाभते.अप्पा पुढे म्हणतात कि अशा एकांतात आनंदात रममाण होताना अनेक भक्ती रचना जन्म घेतात.ईश्वराच्या समीप जाताना एकरुपता वाढत जाते व नामाची गोडी लागते.नामाची आवर्तने सुरु झाली कि *अधरी पाझरे सुरेल गाणे* ही मोहमयी अवस्था होते.

*दरवळतो बहावा मोगरा*

*प्रसन्नतेत तृप्तते जगणे*

*वृंदावनी तेवता फुलवाती*

*सोज्वळ विश्वरूप देखणे*

 

या चार ओळी कवितेच्या सौंदर्याला भावगर्भित शब्दांचा कळस चढवून द्विगुणित करतात.आदरणीय वि.ग. सातपुते सर भावभक्तीला *बहावा मोगरा* संबोधतात.येथे उत्प्रेक्षा अलंकाराचा वापर केला आहे.

कविवर्य म्हणतात मनाच्या उपवनात सुगंधी बहावा दरवळतोय व भक्तीरुपी मोगरा बहरुन आला आहे.या सात्विक आनंदाच्या अनुभूतीने मन प्रसन्न व तृप्त आहे.जीवनाला अर्थ लाभला आहे.

*दरवळतो बहावा मोगरा* हे शब्द कुंडलिनी जागृतीचे ही सूचक आहेत.’बहावा’ पिवळ्या रंगाचा असल्याने शुभ सूचित करतो.

आदरणीय वि.ग. सातपुते सर म्हणतात आपले अंतर्मन जणू तुळशीचे *वृंदावन* आहे जेथे श्यामल श्रीहरीचा वास आहे.या मन गाभार्‍यात *फुलवाती* अर्थात ज्ञानदीप उजळले कि हृदयस्थ परमेश्वराच्या सोज्वळ ,पवित्र अशा विश्वरूपाचे मला सुंदर दर्शन नित्य घडत आहे.

ईश्वर भेटीची तीव्र इच्छा..आध्यात्मिक उन्नती ते भावसमाधीचा प्रवास आदरणीय अप्पांनी आपल्या सुंदर रचनेत मांडला आहे.

 

सौ. गौरी चिंतामणी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा