मंत्री नितेश राणे व उदय सामंत यांची मंत्रिमंडळ बैठकीत ठाम मागणी
शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेत देवेंद्र फडणवीस यांचे तातडीचे आदेश
कणकवली (प्रतिनिधी):
आंबा व काजू शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत वाढवून जास्तीत जास्त कशी देता येईल यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत विश्वास व्यक्त करताना सांगितले की, महायुती सरकार आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे आहे आणि हे केवळ शब्दांत नाही तर कृतीतून लवकरच दिसून येईल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितेश राणे व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबा-काजू शेतकऱ्यांना जाहीर केलेली सध्याची मदत अपुरी असल्याचे ठळकपणे मांडले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिक मदतीची मागणी करत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे केवळ २२० रुपये मिळत असल्याने ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे नमूद करण्यात आले. सहसा मदत न मागणाऱ्या आंबा व काजू शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारने ठामपणे उभे राहावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावर तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
