You are currently viewing आंबोली राखीव वनक्षेत्रात वनविभागाची धडक कारवाई
Oplus_16908288

आंबोली राखीव वनक्षेत्रात वनविभागाची धडक कारवाई

दोन स्वतंत्र कारवायांत आठ शिकारी जेरबंद; मृत व जिवंत वन्यजीव, शिकार साहित्य आणि वाहन जप्त

सावंतवाडी :

आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी रात्री वनविभागाने राबविलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण आठ जणांना अटक केली. या कारवाईत चौकुळ येथील एका व्यक्तीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी दोन संशयित फरार झाले आहेत. त्यांचा शोध वनविभागाकडून सुरू आहे. कारवाईदरम्यान मृत व जिवंत वन्यजीव, शिकार साहित्य तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे.

पहिली कारवाई बुधवारी रात्री सावंतवाडी-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रातील मौजे मासुरे येथे करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विनापरवाना ठासणीच्या बंदुकीने वन्यजीव साळींदरची शिकार करून नेत असताना विठू वाधू कोकरे (वय ४५, रा. चुरणीचीमुस, चौकुळ, ता. सावंतवाडी) याचा वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून ताबा घेतला. त्याच्याकडून साळींदर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी मोठी कारवाई बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास राखीव वनक्षेत्रातील शिरगांवकर पॉईंट येथे करण्यात आली. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांचा पाठलाग करून चौकशी केली असता त्यांच्याकडे मृत वन्यप्राणी पिसोरी आणि कटीदर (फटकर) आढळून आले. याचवेळी घटनास्थळावरून त्यांच्या इतर चार साथीदारांना एमएच ०९ जीएफ ००१४ या चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. मात्र अन्य दोन संशयित फरार होण्यात यशस्वी झाले.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पवन प्रकाश देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), जावेद सलीम जमादार (रा. यादव नगर मेन रोड, कोल्हापूर), हसीम हुसेन काजी (रा. तिरवडे कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, जळववाडी नळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), वनु विठ्ठल फोंडे (रा. एरंडपे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड, नवी सांगवी, पुणे) आणि आकाश मोहन कुरणे (रा. यादव नगर, कोल्हापूर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करून गुरुवारी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संबंधितांना अधिक तपासासाठी २० जूनपर्यंत तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

सदर यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक वैभव सा. बोराटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये वनक्षेत्रपाल वैभव भिसे, वनपाल नामदेव चोगुले, मैबूब नायकवडे, सम्राट पाटील, गोरीश राणे, रविंद्र पाटील, संग्राम पाटील, तानाजी चव्हाण, वासुदेव खोत, अनिकेत आवारे, अनिकेत देशमुख तसेच आर.आर.टी. पथकाने विशेष परिश्रम घेतले.

आंबोली हे पश्चिम घाटातील जैवविविधतेचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याने नागरिकांनी वन्यजीवांच्या शिकारीबाबतची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा