कणकवलीत घनकचरा प्रकल्पात भीषण आग; ८० टक्के प्लास्टिक जळून खाक
हरकुळ माळावर सायंकाळी लागलेल्या आगीत मोठे नुकसान; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
कणकवली (प्रतिनिधी) :
कणकवली नगरपंचायतच्या हरकुळ येथील माळावर असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्रात शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लास्टिक साठवण विभागात मागील बाजूने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे आग काही वेळातच भडकली. या आगीत साठवून ठेवलेल्या प्लास्टिकपैकी जवळपास ८० टक्के प्लास्टिक जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक सत्यजित पारकर, बबली राणे तसेच घनकचरा प्रकल्पाचे ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
