येत्या सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता रोजी अमरावतीला माजी पालकमंत्री मा. श्री प्रवीणभाऊ पोटे पाटील यांच्या मातोश्री स्व. सूर्यकांताताई पोटे पाटील राज्यस्तरीय मराठी साहित्य पुरस्कारांचे वितरण अमरावतीच्या कठोरा रोडवरील पोटे टाऊनशिपमध्ये होणार आहे. यामध्ये विविध साहित्यिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यामध्ये यावर्षीचा साहित्यव्रती पुरस्कार मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व ज्यांची 111 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत अशा भंडारा जिल्ह्यातील डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना जाहीर झाला आहे.
डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील गावात राहणारे व्यक्तिमत्व. आमच्या अमरावतीला जिल्हा परिषदेला माध्यमिक विभागाला ते शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी नागपूर विभागासाठी नागपूर विभागातील साहित्य चळवळीसाठी झाडीबोली चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जे काम केलेले आहे त्याची नोंद घेता त्यांना खरं तर पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या गेले पाहिजे इतका त्यांचा मोठा व्याप आहे.
आपण पुण्यामुंबईच्या नाटकांचा खूप उदो उदो करतो. पण एक वेळ तुम्ही चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये झाडीबोलीची नाटके पाहायला जा. म्हणजे तुम्हाला डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीचा जो उदो उदो केला आहे तो यथार्थ आहे याची खात्री पटेल. आजच्या आधुनिक काळातही झाडीबोलीची नाटके रात्ररात्रभर चालतात. एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या गावी नाटकाच्या 50 कंपन्या आहेत. आणि त्याला खतपाणी घालण्याचे काम या महामानवाने केले आहे. झाडीबोलीचे नाटक होते तेव्हा त्या गावाची जत्रा आहे असा भास होतो. कापडाचा पेंडॉल . माती टाकून केलेला स्टेज. मंडपाच्या आजूबाजूला लागलेली दुकाने हे पाहून या गावात एखादी मोठी जत्रा आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. आजच्या काळात नाटक रात्ररात्रभर चालणे म्हणजे ही ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहिण्यासारखी गोष्ट आहे.
डॉ. बोरकर नुसते 111 पुस्तके लिहून थांबले नाहीत तर त्यांनी झाडीबोलीची चळवळ जिवंत ठेवली. वेगवेगळ्या ठिकाणी झाडीबोलीचे साहित्य संमेलन घेतले. इतर लोकांना प्रोत्साहित केले .शासन दरबारी त्यांची वेगवेगळ्या समित्यांवर निवड झाली .विदर्भ साहित्य संघ असो की मराठी विश्वकोश मंडळ किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या सर्व संस्थांवर ते कधी सदस्य म्हणून तर कधी पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिले.
बोरकरांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे चळवळ जिवंत ठेवणे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे. त्यांना नाटकासाठी लेखनासाठी भाषणासाठी प्रवृत्त करणे. कविता लिहिणे सोपे आहे. कथा लिहिणे सोपे आहे .पण या सर्व लेखकांना कवींना संघटित करून त्यांना हक्काचे विचारपीठ मिळवून देणे ही कठीण गोष्ट आहे. त्यासाठी खस्ता खाव्या लागतात. लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्या लागतात. ते सर्व बोरकरांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन विदर्भ साहित्य संघ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संगीत साहित्य अकादमी अशा विविध संस्थांतर्फे त्यांना आतापर्यंत बावन पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याच्या मानाने हे पुरस्कार योग्यच आहेत. कारण त्यांनी 104 गावांमध्ये झाडीबोली साहित्य परिषदेच्या शाखा काढून भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील साहित्यिकांना लोक कलावंतांना एकत्र आणण्याचे व त्यांना विचारपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मराठी विश्वकोश तसेच शासनाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत होते आणि आजही आहेत. महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना एकत्र बांधणारी मराठी बोली साहित्य संघ नावाची संघटना देखील त्यांनी उभारली आहे व तिला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद आहे.
डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी लिहिलेल्या साहित्यावर आतापर्यंत चार लोकांनी पी आय डी पदवी प्राप्त केली आहे. आणि अजून सहा लोक श्री बोरकर यांच्या साहित्यावर पीएचडी करीत आहेत. एका दुर्गम भागात राहणाऱ्या लेखकाच्या साहित्यावर दहा पीएचडी म्हणजे फार मोठी गोष्ट झाली. पण बोरकरांचे कर्तृत्वही हे तेवढेच महान आहे यात शंका नाही
आज वयाच्या 80 व्या वर्षाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. पण त्यांची चळवळ थांबलेली नाही. लेखन थांबलेले नाही. लोकांना प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती थांबलेली नाही. याही वयात ते गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया सारख्या दुर्गम भागात जाऊन झाडी बोलीला जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत व करणारही आहेत आणि म्हणूनच यावर्षी या साहित्यव्रती पुरस्कारासाठी या पुरस्काराच्या समितीच्या संयोजिका व मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका प्राचार्य डॉ.शोभाताई रोकडे यांनी व मुख्य आयोजक श्री प्रवीणभाऊ पोटे पाटील श्री श्रेयस पोटे पाटील प्राचार्य अनुप्रिता देशमुख डॉ.कुमार बोबडे. डॉ.पंकज वानखडे व त्यांच्या समितीने एकमताने साहित्यव्रती पुरस्कारासाठी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड केली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी लेखकांसाठी कवींसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या एका जननायकाला साहित्यव्रती पुरस्कार देऊन समितीने जो गौरव केलेला आहे त्याबद्दल समिती अभिनंदनास पात्र आहे आणि डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी या सगळ्या कामासाठी स्वतःला जन्मभर वाहून घेतले आहे त्यांच्या या व्रताला आमचा मानाचा मुजरा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
