*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी आबासाहेब कडू यांचे ‘बहिरमबॉचे टोले’ कथासंग्रहाचे केलेले परीक्षण*
*‘बहिरमबॉचे टोले’*
आबासाहेब कडू, वऱ्हाडी मातीशी इमान राखणारं एक दिलदार व हरहुन्नरी व्यक्तिमत्व. त्यांचं असणं, दिसणं आणि बोलणं सगळच समोरच्या व्यक्तीला खिळवून टाकणारं!
‘बहिरमबॉचे टोले’ हे त्यांचं अस्सल वऱ्हाडी भाषेतलं २०२५ मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक ! तब्बल एक वर्षाने म्हणजे २६ जानेवारी २०२६ मध्ये माझ्या हाती पडलं.मी नेहमी म्हणते कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते,आणि ते खरंच आहे.
हे पुस्तक आबासाहेबांनी वऱ्हाडच्या मातीतच देव झालेल्या सबन मायमाऊल्याईले अर्पण केले आहे. तसेच दैनिक हिंदुस्थानचे आपल्या सगळ्यांचे आवडते मा. विलासजी मराठे व ज्यांनी त्यांना हे पुस्तक लिहिण्यासाठी सर्वप्रकारे मदत केली त्यांचा नम्रतेने ऋणनिर्देश केला आहे.सुरवातीला सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या जी. बी. देशमुखांची सुंदर प्रस्तावना आहे. लेखकाचे दोन शब्द आहेत.आणि अंतरंगात अस्सल वऱ्हाडी भाषेत २० कथा आहेत.
लेखक पाटबंधारे विभागात अभियंता होते.बालपण खेड्यात गेल्यामुळे ते ग्रामीण जीवनातील प्रथा-परंपरांशी जवळून परिचित आहेत.सध्या शहरी भागात वास्तव्यास असूनही ते आपल्या मायबोलीला विसरले नाहीत. मायबोलीशी ते आजही प्रामाणिक आहेत.त्यामुळे सर्व कथात त्यांचे वऱ्हाडी भाषेवरील प्रभुत्व सहज लक्षात येते.
पहिल्या ‘फोळनीचं ताक’ या कथेत एक जावई बायकोच्या माहेरी येतो, सासू त्याचे धुमधडाक्यात स्वागत करते, पण त्याच्याबरोबर आलेल्या त्याच्या वडिलांशी ती कसा व्यवहार करते ह्याचे मनोरंजक वर्णन आलेले आहे.शेवट या घटनेला सुसंगत अशा ‘अरकार परकार जवायाले अन् फोळनीचं ताक ईवायाले’ या वऱ्हाडी म्हणीने केला आहे.
दुसऱ्या कथेत बायकोचा भाऊ म्हणजे नुसती डोकेदुखी असते ह्याचे मार्मिक चित्रण केले आहे.अशाच प्रकारच्या गमतीदार कथांतून खेड्यातील जनजीवन,मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, ग्रामसफाई साठी गावच्या पाटलाची होणारी ओढाताण ‘झाकली मूठ सवा लाखाची’ कशी असते अशा मजेदार कथा आहेत. आबासाहेबांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की पुस्तक वाचतांना पुढे कोणती कथा असेल म्हणून वाचकांची उत्कंठा वाढत जाते, ढंगरी बुढी ह्या पात्राने दोन तीन कथानकात रंगत आणली आहे, ‘टायपिंग मिस्टेक’ कथेमध्ये धरणाच्या कामात मारुतीभौची जमीन गेली असते, तरी त्याला त्याबद्दल मोबदला मिळालेला नसतो. म्हणून तो ऑफिस मध्ये वारंवार चकरा मारतो.तिथे त्याला आलेल्या अनुभवाचे मोठे गमतीदार वर्णन वाचावयास मिळते.’घरोघरी मातीच्या चुली’ या कथेत इनायक म्हाली आणि कटींग करायला आलेले नेहमीचे गिऱ्हाईक भौसाहेब या दोघांच्या घरून येणाऱ्या फोनमुळे दोघेही त्रस्त असतात.
’अदलाबदल’ ही अशीच एक कथा लेखकाची अचाट कल्पनाशक्ती दाखविणारी दिसून येते. ढंगरी बुढीचा नवरा एका लग्नासाठी अमरावतीला येतो. तलफ भागवायला बाहेर गेलेले त्याचे सोबती लवकर न आल्याने बुढा ऑटोने स्टँडवर यायला निघतो. आटोचे ब्रेक फेल झाल्याने हा आटो दुसऱ्या आटोवर जाऊन आदळतो. झालेल्या भीषण अपघातात बुढा मरण पावतो. सोपस्कारानंतर घरी जी बॉडी आणली जाते ती आपल्या नवऱ्याची नाही हे फक्त ढंगरी बुढीच ओळखते, पण ती म्हातारी असल्यामुळे तिचे बोलणे कोणी मनावर घेत नाही.हो नाहीचा घोळ चालू असतानाच ऐन वेळेवर एक ऍम्ब्युलन्स येते,त्यात ढंगरी बुढीच्या बुढ्याचे खरे प्रेत असते. लेखकाने ही कथा खूपच छान पद्धतीने रंगविली आहे. ह्यावरून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण व दुःखद प्रसंगातही विनोद निर्मिती करण्याची हातोटी लक्षात येते.पुढच्या ‘पुन्याचा इवाई’, ‘चोरावर मोर’, ‘झाळाची डांग’ ह्या गोष्टी अशाच विनोद निर्माण करणाऱ्या आहेत. ‘आता काय करावं ‘ ह्या कथेत विनोदाची झालर लावीत आजच्या लग्नात होणाऱ्या फोटोगिरीवर लक्ष वेधले आहे.
शेवटल्या ‘बोलावा ईठ्ठल’ या कथेत गुंफी घरादाराची काळजी न करता पंढरपूरला निघते.त्याच वेळी तिच्या माहेर गावचा सायबराव कामाच्या निमित्ताने तिच्या गावात येतो गुंफी माहेरचा माणूस म्हणून त्याला आपल्या घरात राहायला सांगते, तिकडे गुंफी तनमन विसरून पंढरपुरात रमलेली असते. ती यात्रा उरकून परत येते तोवर जणू सायबरावाच्या रुपात विठोबा तिच्या घरची सगळे कामे करीत असतो ती वारीहून परत येते, योगायोगाने सायबराव सुद्धा काम संपले असे सांगून परत गेलेले असतात ह्यालाच म्हणतात ‘भाव तिथे देव’.वऱ्हाडी बोलीभाषेत असलेली ही कथा आपल्यालाही भक्तीरसात घेऊन जाते.
आबासाहेबांच्या ह्या सगळ्या कथा आपल्याला नवरसांचे दर्शन घडवितात. विशेष म्हणजे वाचताना शहरी लोकांना वऱ्हाडी भाषेचा कंटाळा येणार नाही अशा ह्या कथा छोट्या आहेत त्यात भाषेचा पाल्हाळ अजिबात नाही.या सुंदर कथांचा आस्वाद घेण्यासाठी ‘बहीरमबॉचे टोले’
हे पुस्तक वाचनप्रेमी रसिकांनी नक्कीच वाचायला हवे. आबासाहेबांनी असेच छान छान लिहीत राहावे ही शुभेच्छा.
*’बहिरमबॉचे टोले’:कथासंग्रह*
*प्रकाशक:-ज्ञानपथ पब्लीकेशन*
*परिक्षण लेख:- प्रतिभा पिटके, अमरावती (९४२१८२८४१३)*
