You are currently viewing कृषकांचे कैवारी ,कृषिपुत्र कृषिरत्न डाॅ.पंजाबराव देशमुख

कृषकांचे कैवारी ,कृषिपुत्र कृषिरत्न डाॅ.पंजाबराव देशमुख

*कृषकांचे कैवारी ,कृषिपुत्र कृषिरत्न डाॅ.पंजाबराव देशमुख*……….

==============
डाॅ.पंजाबराव उर्फ भाऊसाहेब शामराव देशमुख आधुनिक भारताच्या इतिहासातील २० व्या शतकातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.त्यांचे सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय आहे.भारताच्या संविधान निर्मितीत अत्यंत हिरीरीने व मोलाचा सहभाग देणार्‍या व्यक्तीमध्ये त्यांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो.आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डाॅ.पंजाबराव देशमुखांचे चरित्र नवपिढीने अभ्यासले पाहिजे.
२७ डिसेंबर १८९८ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी श्री.शामराव व राधाबाई यांच्या पोटी जन्मलेले डाॅ.पंजाबराव कृषीपुत्र होते.
ते विदर्भाचे भाग्यविधाते तर होतेच पण अखिल भारतातील एक उत्तुंग, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (Dynamic Personality ) व द्रष्टे समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.शिक्षणप्रसार,कृषिसुधार,कृषककल्याण, अस्पृश्यता निवारण,गोरगरीब दलितांकरिता श्रध्दानंद वसतिगृह,कृषि,सहकार, शिक्षण,लोककर्म इ. खात्यांचे मध्यप्रांताचे मंत्री,व स्वतंत्र भारतातील कृषि खात्याचे मंत्री,शेतकी मंत्र्यांच्या मंडळाचे परदेशात जाणारे नेते,दिल्ली येथील ११ डिंसेबर १९५९ ते २९ फेब्रु १९६० या कालावधीमध्ये भरविलेल्या जागतिक कृषी व औद्योगीक प्रदर्शनाचे प्रेरक,कृषिविषयक अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष,श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष,लंडन येथे श्री.शिवाजी एज्युकेशन ट्रस्टची स्थापना शेतकरी,मजूर,दलितांकरिता शाळा,खादी प्रचार इ.सर्व क्षेत्रातील त्यांनी केलेल्या दैदिप्यमान कार्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक परिपूर्ण व द्रष्टे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. __________________
*शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेले कृषिपुत्र डाॅ.पंजाबराव…..* __________________
तत्कालीन परिस्थितीत उच्चविद्याविभूषीत होऊन इंग्लंडहून १९२६ ला भारतात परत आल्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या अडचणींना तोंड देण्यासाठी “मध्यप्रांत वर्‍हाड शेतकरी संघ” स्थापन करुन शेतकरी वर्गाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून दिले व या संस्थेमार्फत अनेक कृषीविषयक सुधारणा घडवून आणल्या.
१९२८-३० या काळात अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकर्‍यांच्या विकासाच्या अनेक योजना राबविल्या.१९३० मध्ये मध्यप्रांत वर्‍हाड(CP&Berar) मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून कृषी क्षेत्रात नवनवीन पध्दतींचा अवलंब त्यांनी केला.
१९५२ ते १९६२ अशी दहा वर्ष त्यांनी देशाचे कृषी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.या कालावधीत भारतीय कृषिविकासाच्या दृष्टीने डाॅ.भाऊसाहेबांनी अखिल भारतीय स्तरावर “न भूतो न भविष्यती” अशा स्वरुपाचे कार्य केले.
त्यांनी दोन पंचवार्षिक योजना संदर्भात भारताचे अन्न स्वावलंबन साध्य केले.त्याचबरोबर योग्य हमी भाव निर्धारित केले.नगदी पिकांना उत्तेजन दिले. जपानी भातशेतीचा प्रयोग १९५२ पासून भारतात यशस्वीपणे राबविला त्यामुळे भारतात तांदळाच्या उत्पादनात क्रांती घडून आली म्हणून तांदुळ उत्पादनाचे तज्ञ म्हणून डाॅ.पंजाबराव देशमुख आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले.त्याबरोबरच त्यांनी सहकार चळवळीला महत्व देऊन शेतकर्‍यांना कर्जे, पतपुरवठा करणार्‍या विविध राष्ट्रीय यंत्रणाही त्यांनी उभारल्या. शेतकर्‍यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक कृषीविषयक संस्था स्थापन केल्या.अनेक लोकोपयोगी कायदे करून त्यांची अंमलबजावणी केली आणि भारतीय कृषी विकासाचा पाया घातला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी १९५५ साली अराजकीय व जात पात विरहित अशी *भारत कृषक समाज* ही संस्था स्थापन केली. ही भारतातील हरितक्रांतीची उदगाती राष्ट्रीय संस्था मानली जाते. या समाजामार्फत त्यांनी प्रदर्शने, परिषदा, कृषक मेळावे इ.सारख्या कार्यक्रमांतून अधिक भरीव अशा कृषी कार्यवाहीची पायाभरणी केली.भारत कृषक समाजामार्फत दिल्ली येथे १९५९-६० साली जागतिक कृषी प्रदर्शन भरवून विदेशी शेतकरी आपल्यापेक्षा किती प्रगत आहेत हे दाखवून देताना विज्ञानवादी दृष्टीकोन व उद्योगशीलतेची जाणीव त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना करून दिली.
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक कार्य पाहता शेतकऱ्यांची सर्वागीण प्रगती झाली पाहिजे या जाणीवेतूनच ते जगले याची प्रचिती त्यांच्या कार्यावरून येते.
कृषी मंत्री असताना परदेशात त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय शेती व युरोपियन शेती याचा तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यावर अनेक ठिकाणी विद्वत्तापूर्ण भाषणे दिली होती. त्या त्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेले विचार मौलिक आहेत.आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ.पंजाबराव देशमुख यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील विविधांगी कार्य आजच्या २१ व्या शतकातील कृषीपुत्रांना प्रेरणादायी असेच आहे. स्वतः कृषीपुत्र व स्वतंत्र भारताचे कृषीमंत्री या जाणीवेतून कृषी आणि कृषकांचा विकास हाच ध्यास त्यांच्या ठिकाणी होता.
शेतकर्‍यासाठी त्यांनी भारत कृषक समाज १९५५,
युवक कृषक समाज १९५६ या राष्ट्रीय पातळीवरील संस्थाबरोबरच
कृषिविषयक अनेक संलग्न संस्थांची उभारणी त्यांनी केली त्यामध्ये
शेतकरी बॅंक १९६१,
अखिल भारतीय मधमाशी पालक संघटना १९५३
अखिल भारतीय खाद्य तेलबिया संघटना १९५४,
लाखोंकरिता अन्न संघटना १९५५,
आखिल भारतीय ताडगूळ महासंघ १९५५,
राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ १९५८,
भारत कृषक सहकारी अधिकोष१९६० इ.अनेक संस्थाची उभारणी केली.त्याचबरोबर बाहेरील देशातील नवनवीन शेतीतंत्रज्ञान व कृषीविकास पाहण्यासाठी शेतकर्‍यांचे अभ्यास दौरे, आंतरराष्र्टीय शेतकर्‍यांंचे आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित केले. अनेक कृषीपूरक संस्थांच्या उभारणी बरोबरच ,कुक्कुटपालन,दुग्धउत्पादन,मत्स्यपालन, शेळीमेंढीपालन, मधुमख्खीपालन,ताडगूळ, नीरा,पिगरीज, केशरबागा, सफरचंदबागा.आमराया,वनशेती इ.ना त्यांनी शेती व शेतीचे जोडधंदे मानले.त्यांच्यामते पशुधनाची जोड अन्नधान्य उत्पादनाला दिली कि शेतीमध्ये क्रांती व्हायला सुरुवात होते यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. त्याचबरोबर अमेरिकेतील लँड-ग्रँड काॅलेजच्या धर्तीवर भारतातही प्रत्येक राज्यात एक कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची योजना डाॅ.पंजाबरावांनी अंमलात आणली व त्यानूसार भारतातील पहिले कृषी विद्यापीठ उत्तर प्रदेशातील पंतनगर या ठिकाणी सुरु झाले.महाराष्ट्रात सुरुवातीला अकोला व राहूरी अशी दोन कृषी विद्यापीठे सुरु झाली.आज अनेक कृषी विद्यापीठे स्थापन झालीत.कृषीचे आधुनिक शिक्षण शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन देण्याची योजना करणारे कृषी विद्यापीठ त्यांना अभिप्रेत होते आज कृषी क्षेत्रातील अनेक विज्ञानवादी प्रयोग याठिकाणी केले जात आहेत याचा पाया डाॅ.पंजाबराव देशमुखांनी घातला.
अलीकडेच देशातील लाखो कृषकांनी आपल्या मागण्यांसाठी देशाच्या राजधानीत दिल्लीत अनेक दिवस आंदोलन केले होते व आजही शेतकरी आपल्या मागण्यासाठी अनेक भागात आंदोलन करत आहेत. देशाच्या याच राजधानी दिल्लीत डाॅ.पंजाबरावांनी ११ डिसेंबर १९५९ ते २९ फेब्रुवारी १९६० या कालावधीत अपूर्व असे जागतिक कृषी प्रदर्शन भरविले.यामध्ये अमेरिका, रशिया,चीन,पोलंड,फ्रास ब्रिटन,कोरिया,इराण, सिलोन,मंगोलिया, अफगाणिस्तान, व्हिएतनाम,ब्रह्मदेश, झेकोस्लोव्हाकिया जर्मनी इ.राष्र्टे सहभागी झाली होती. ११ डिंसेबर १९५९ पासून ही प्रदर्शनी पाहण्यासाठी देशविदेशातुन लाखो शेतकरी आले होते.भारत कृषक समाजाने शेतकर्‍यांसाठी हजारो राहूट्या उभारल्या होत्या.संपूर्ण दिल्ली शहरात जिकडेतिकडे भिन्न भाषा बोलणारे,भिन्न वेष धारण केलेले कृषक आले होते.दिल्ली शहराला अफाट यात्रेचे स्वरुप आले होते.लाखो शेतकर्‍यांनी हा अपुर्व असा कृषी सोहळा अनुभवला.विराट असे स्वरुप या प्रदर्शनाला होते.
हे प्रदर्शन जवळजवळ २ कोटी शेतकर्‍यांनी पाहिले.हे प्रदर्शन भरवून डाॅ.पंजाबरावांनी भारतातील शेतकर्‍यांना प्रगत व विज्ञानवादी कृषीतंत्रज्ञानाची माहिती करुन दिली.नवक्रांतीच्या मार्गाने व्यवसाय करण्यास प्रवृत केले.शेतकर्‍यांना संघटित केले,नवा विचार दिला,जागृत केले. म्हणूनच स्वातंत्रोत्तर भारताच्या कृषी क्रांतीचे डॉ.पंजाबराव देशमुख जनक ठरतात.
डाॅ.पंजाबराव देशमुखांचे कृषीविषयक कार्य पाहता शेतकर्‍यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे या जाणिवेतुनच ते जगले.आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डाॅ.पंजाबराव देशमुखांचे योगदान मोठे आहे.विवीधांगी चिरंतन असे कार्य केलेल्या शिक्षणमहर्षी कृषिपुत्र ,कृषिरत्न डाॅ.पंजाबराव देशमुखांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
==============
*प्रा. डॉ. सौं. कल्पना राजीव मोहिते, इतिहास विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर,ता. वाळवा जि. सांगली*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + thirteen =