श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये २००७ च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर उत्साहात संपन्न.
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये येथे दिनांक २ मे २०२६ रोजी सन २००७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलावा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या क्षणांना पुन्हा एकदा अनुभवले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. देशमुख मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
स्नेहमिलाव्यादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी रु. ४०,००० ची देणगी प्रदान केली. या देणगीमुळे शाळेतील विविध विकासकामांना चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश देसाई यांनी उत्कृष्टरीत्या केले,
सौ सोनम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला तर शेवटी परेश देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. स्नेह, आठवणी आणि शाळेप्रती असलेली आत्मीयता यामुळे हा स्नेहमिलावा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
