पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांचे प्रतिपादन
मी स्वतः नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेलो आहे. शहरी भागात स्पर्धा परीक्षाविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन मी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ग्रंथालय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा मुलाखत तंत्र सारखे उपक्रम राबवून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहे असे उद्गार नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण )व सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री निकेतन कदम यांनी आज अमरावती येथे काढले. यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांची धुळे येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर नागपूर पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त असलेले श्री निकेतन कदम यांची अमरावती ग्रामीणला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली असून आज डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
श्री निकेतन कदम यापूर्वी धारणी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी धारणी भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत धारणी येथे स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम सुरू केले होते. धारणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी व इतर विद्यार्थ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. तो अनुभव गाठीशी असल्यामुळे
त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प या ठिकाणी जाहीर केला.
श्री निकेतन कदम हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निभफुल या ग्रामीण भागातील गावातील असून त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मेशी या लहानशा गावात झालेले आहे. त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये नोकरीला होते. त्यांचा भाग जरी ग्रामीण असला तरी श्री निकेतन कदम यांनी आपला अभ्यास काळजीपूर्वक केला.दहावीनंतर त्यांनी तंत्रनिकेतनचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला .त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून बी इ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते एका आयटी कंपनीमध्ये रुजू झाले. तिथे दोन वर्ष सेवा केल्यानंतर त्या सेवेचा राजीनामा देऊन ते स्पर्धा परीक्षेकडे म्हणजे आयएएस कडे वळले. 2019 यावर्षी ते आयपीएस ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले.
ते अमरावती ग्रामीणला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होताच अमरावती परतवाडा रोडवरील सिकची रिसॉर्ट येथे 16 ते 22 मे या सात दिवसाच्या कालावधीत मिशन आय ए एस तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचे निमंत्रण देण्यासाठी मिशन आय ए एस चे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे कार्याध्यक्ष श्री नंदकिशोर खडसे
सदस्य श्री प्रवीण वासनीक सदस्य श्री चंद्रशेखर गुलवाडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सात दिवसाच्या शिबिराचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण त्यांनी
स्वीकारले असून स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रमामध्ये आपली रुची व्यक्त केली .तसेच मिशन आयएएस हा उपक्रम चांगला असून माझ्या स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांना सामावून घेणार आहे असेही विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. सर्व अभ्यागतांशी त्यांनी आस्थेने व जिव्हाळ्याने चर्चा करून सात दिवसाच्या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
एक तरुण तडफदार ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आज अमरावती जिल्हा ग्रामीणला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून लाभलेला आहे. ते स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांना खेड्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी त्यांच्यामध्ये दिसून आली. मिशन आयएएसने देखील त्यांच्या स्पर्धा परीक्षा विषय उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपली अनुमती दर्शविली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस विभागाला श्री निकेतन कदम यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष तत्पर तेजस्वी व तपस्वी जिल्हा पोलीस अधीक्षक लाभल्यामुळे नागरिकांमध्ये संतोषाचे वातावरण दिसून येत आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम हे उत्तम मार्गदर्शक म्हणून लाभल्याबद्दल स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
