शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन;
गाव विकासासाठी निधीचे आश्वासन
कणकवली :
तालुक्यातील भरणी ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी भरणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी संजय आग्रे यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. भरणी गावाशी आपले जुने संबंध असून ग्रामस्थांशी विशेष आपुलकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदेश पटेल यांनी गावातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच नवीन कामांसाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरणी सरपंच अनिल बागवे होते. त्यांनी ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संजय आग्रे यांचे आभार मानले. तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत विकास निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचेही आभार व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संदेश पटेल, विवेक ताम्हणकर, उपसरपंच प्रशांत घाडी, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष चंद्रकांत घाडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बागवे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय गुरव, श्रीमती जगताप, माजी पोलीस पाटील अनंत गुरव, तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
