डॉ. चंद्रकांत सावंत यांना ‘प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑफ मेरिट’ सन्मान
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावचे सुपुत्र व ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत तुकाराम सावंत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षण आणि समाजकार्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत अमेरिकेच्या ‘हॉल ऑफ लेजेंड्स’तर्फे त्यांना प्रतिष्ठेचा ‘प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑफ मेरिट’ (Presidential Order of Merit) हा जागतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. १८ मार्च २०२६ रोजी त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.
डॉ. सावंत यांनी शिक्षण, तत्त्वज्ञान आणि समाजकार्य या क्षेत्रांत भरीव योगदान दिले असून त्यांच्या कार्याची छाप व्यापक पातळीवर उमटली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ८६ शाळांमधील १४६ गरीब विद्यार्थिनींच्या आजीवन शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून बालिका शिक्षणासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या या कार्याची नोंद जागतिक स्तरावरील ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही करण्यात आली आहे.
तसेच, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदव्या संपादन केल्या असून एक अभ्यासू व समर्पित व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. अमेरिकेतील ‘इकोहग एलएलसी’ (Echohug LLC, Wyoming) या संस्थेद्वारे प्रमाणित या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर अधिक ठळक नोंद झाली आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणाऱ्या डॉ. चंद्रकांत सावंत यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ त्यांचाच नसून महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव असल्याचे मानले जात आहे.
