*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिर्षक : वसंत आला*
—————————————
रंगात रंगला अन गंधात धुंद न्हाला
पाना फुलांत सजुनी आला वसंत आला
कोकीळ सुस्वराने गातो भल्या पहाटे
घेऊन सौख्य दारी आलाय स्वर्ग वाटे
सूर्यास मावळाया आता उशीर झाला
पानाफुलांत सजुनी आला वसंत आला
चाफा भरास आला, आंब्यास गंध सुटला
वेली तरुस साऱ्या स्वर्गीय कोंब फुटला
ओठांस मस्त लावा आनंदकंद प्याला
पानाफुलांत सजुनी आला वसंत आला
चैतन्य आज वाहे साऱ्या दिशादिशांनी
स्वर्गातुनी उतरले तारे कशा मिशानी
चंद्रास साद घाले कुठली अनाम बाला
पानाफुलांत सजुनी आला वसंत आला
श्रीनिवास गडकरी
पुणे
