You are currently viewing मिशन आयएएसतर्फे आयएएस झालेल्या रेणुकाचा सत्कार संपन्न 

मिशन आयएएसतर्फे आयएएस झालेल्या रेणुकाचा सत्कार संपन्न 

अमरावती दि. 12 –

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला तर ती मुले हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात असे उद्गार यावर्षीच्या आयएएस परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या अकोला जिल्ह्यातील पातूर येथील कुमारी केतन दिनेशराव केकन हिने पातुर येथे काढले. तिने आयएएसच्या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर व पुण्यावरून ती पातुरला परत आल्यानंतर मिशन आयएएसचे संस्थापक प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे व अकोल्याचे मिशन आयएएसचे विभागीय संचालक व सुप्रसिद्ध उद्योजक श्री रुपेश राठी यांनी तिच्या घरी जाऊन तिला सन्मानपत्र देऊन तिचा आयएएसच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त केल्याबद्दल गौरव केला. त्याचबरोबर तिचे वडील व जिल्हा परिषद अध्यापक श्री दिनेशराव केकन यांचा व तिच्या मातोश्री सौ शोभाताई यांचा देखील बुके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पातूर येथील गोरक्षण केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बोरकर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री अरुण भाऊ काकड पुरुषोत्तम घुगे गजानन केकन संजय केकन राजेंद्र घुगे अजयकुमार नागरे सुशील कुमार सांगळे व सुनील भाऊ राख हे उपस्थित होते.

कुमारी रेणुका केकन हिचे शिक्षण अकोला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले असून तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण अकोला जिल्ह्यातील पातूर येथील कावल कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जळगावच्या दीपस्तंभ ह्या सुप्रसिद्ध संस्थेमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी संस्थेचे संस्थापक श्री यजुर्वेद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण केला. दीपस्तंभमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे व त्या ठिकाणी वेळोवेळी आलेल्या सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आपण हे यश संपादन करू शकलो असे तिने यावेळी सांगितले.

मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला सतत प्रेरणा दिली. ते मला नेहमी म्हणायचे की तुझी सही घेण्यासाठी रांग लागली पाहिजे. त्यांच्या या प्रेरणेमुळे मी शालेय जीवनात असतानाच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून माझ्या अभ्यासाची आखणी केली होती. त्यामुळे मी अल्पावधीमध्ये हे यश प्राप्त करू शकले.

तिच्या या यशामुळे संपूर्ण पातूर शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून पुण्यावरून ती पातुरला येतात गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढली. चौका चौकात तिच्या स्वागतासाठी तिचे भव्य छायाचित्र असलेले फलक लागलेले होते. पातूर परिसरातील लोकांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली होती. ग्रामीण भागात राहून व ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन रेणुका ने यश संपादन करून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा