तरुणाईच्या अभिनयाने रंगली रंगभूमी
महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६** अंतिम फेरीला मुंबईत उत्साहात सुरुवात; १७ महाविद्यालयांचे संघ सहभाग
मुंबई,
महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या **महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६** च्या अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा १० ते १४ मार्चदरम्यान माटुंगा येथील **यशवंत नाट्य मंदिर** येथे आयोजित करण्यात आली असून राज्यभरातील १७ महाविद्यालयांतील विद्यार्थी कलाकार त्यामध्ये सहभाग घेत आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन साहित्यिक, कवी, नाटककार व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे माजी संचालक **संजय कृष्णाजी पाटील** आणि ज्येष्ठ रंगकर्मी **प्रमोद पवार** यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ दिग्दर्शक **पुरुषोत्तम बेर्डे**, ज्येष्ठ अभिनेत्री **सविता मालपेकर** आणि ज्येष्ठ रंगकर्मी **डॉ. अनिल बांदिवडेकर** उपस्थित होते. या तिघांकडे स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक **श्रीराम पांडे** यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना **संजय कृष्णाजी पाटील** यांनी सांगितले की, मागील ६४ वर्षांपासून सातत्याने राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील एकमेव राज्य आहे. या स्पर्धेतून अनेक उत्तम कलाकार, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि संगीतकार घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री **आशिष शेलार** यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड निर्माण करणे तसेच नवोदित लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव **डॉ. किरण कुलकर्णी** यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत राज्यभरातून एकूण ८३ एकांकिका सादर झाल्या होत्या. त्यापैकी निवड झालेल्या १७ महाविद्यालयांचे संघ अंतिम फेरीत आपापल्या एकांकिका सादर करत आहेत. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवर आधारित या एकांकिकांमुळे प्रेक्षकांना दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण नाट्यप्रयोग अनुभवण्याची संधी मिळत आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळून मराठी रंगभूमीसाठी नव्या पिढीतील कलाकार घडण्यास हातभार लागेल, असा विश्वास मंत्री **आशिष शेलार** यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या सर्व एकांकिकांसाठी प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अंतिम फेरीतील एकांकिका पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संचालक **श्रीराम पांडे** यांनी केले आहे.
