हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी
कणकवली :
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील बदलामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात राणे यांनी नमूद केले आहे की, यावर्षी अवेळी पाऊस, दीर्घकाळ थंडी आणि फुलोऱ्याच्या काळात वाढलेली आर्द्रता यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे. अनेक बागांमधील आंब्याचा फुलोरा कोरडा पडला असून मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी विभाग तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या शास्त्रज्ञांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणी अहवालानुसार यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादनात साधारण ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी ओळखला जातो आणि हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न या पिकावर अवलंबून आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करणे, प्रभावित आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत किंवा मदत पॅकेज जाहीर करणे, केंद्र सरकारच्या कृषी मदत योजनांतर्गत सहाय्य देणे तसेच कोकणातील बागायती पिकांवर हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदत करावी, अशी विनंतीही नारायण राणे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
