*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अनिल देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’ती’ला वंदन*
तुझ्याच कष्टांतून हा
संसार सारा डोलतो
आत्मविश्वासच तुझा,
आज नभाशी बोलतो ||१||
तू घराचा श्वास आहेस
तूच पाया अन् कळस
जिद्द तुझी अन् तेज पाहुन,
सूर्य सुद्धा रापतो ||२||
सोसतेस तू दुःख तरीही
हास्य सदा ओठी असते
शक्तीचा जो स्त्रोत तुझा,
तव संकटांना थोपवतो ||३||
माया कधी, ममता कधी
होशी कधी रणरागिणी
तुझ्याच रक्त-घामावरी,
प्रपंच सारा चालतो ||४||
विज्ञानाचे क्षेत्र असो वा
असो रणांगण युद्धाचे
हरेक क्षेत्री आज तुझा गे,
अमित ठसाही उमटतो ||५||
तू कुणाची लेक, भगिनी
तूच पत्नी, तू आईही
महिला दिनी गौरव तुझा,
काळही तुज वंदितो ||६||
अनिल देशपांडे, नाशिक
08 मार्च 2026
