*पालकमंत्र्यांनी १२५ क्षयरुग्णांना घेतले दत्तक*
*उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदकांसह गुणवंत विद्यार्थी, युवा, शेतकरी, कलाकार व विविध क्षेत्रातील योगदानाचा सन्मान*
सिंधुदुर्गनगरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, युवक, शेतकरी, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील रहिवाशांना सातबारा वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट सेवा पदके प्रदान करण्यात आली.
*उत्कृष्ट सेवा पदक* : महाराष्ट्र पोलीस दलात १५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. मोहन मुरलीधर दहिकर, पोलीस निरीक्षक प्रविण अशोक कोल्हे , पोलीस हवालदार राकेश रवींद्र कडुलकर, पोलीस हवालदार प्रमोद बाळकृष्ण काळसेकर, पोलीस हवालदार किरण कृष्णा देसाई, पोलीस हवालदार बस्त्याव पेंद्रू डिसोजा आणि पोलीस हवालदार राहुल शिवाजी काळे यांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. अतिउत्कृष्ट सेवा पदक महाराष्ट्र पोलीस दलात २५ वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावल्याबद्दल राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, पोलीस उपनिरीक्षक संजय पुंडलिक साटम, पोलीस उपनिरीक्षक वासुदेव विश्वनाथ वरवडेकर, सहाय्यक पोलीस फौजदार भालचंद्र मो. दाभोळकर आणि सहाय्यक पोलीस फौजदार डॉमनिक संतान डिसोजा यांना प्रदान करण्यात आले.
प्रतिभावान कलाकार व आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाचा गौरव : सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने प्रतिभावान कलाकार म्हणून पियानो वादक कु. विजय तुळसकर, रा. तुळस ता. वेंगुर्ला आणि सिंधुदुर्गची नृत्यांगना व कोरिओग्राफर कु. नेहा जाधव, रा. कुडाळ यांचा सन्मान करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रामदास मेघश्याम नाईक, रा. तुळस ता. वेंगुर्ला यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यातून पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचविणे तसेच नदीपात्रातून शेतात येणाऱ्या मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम विनामूल्य करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीमध्ये राज्यात गुणवत्ताधारक ठरलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये कु. तन्वी तानाजी भोसले, जिल्हा परिषद शाळा साळशी नं. १; कु. शर्विल आनंद वरटे, जिल्हा परिषद शाळा नेरूर चांदोस, ता. कुडाळ; कु. योगीराज प्रमोद गावडे , जिल्हा परिषद शाळा एमआयडीसी कुडाळ, ता. कुडाळ; आणि कु. वेदा प्रविण राऊळ, यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चराठे सावंतवाडी, ता. सावंतवाडी यांचा समावेश आहे.
जिल्हा युवा पुरस्काराने तिघांचा गौरव : सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री. जयराम आत्माराम जाधव, श्रीमती फिजा अब्दुल मकानदार आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत घोषित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यामध्ये श्री. शरद गणपत धुरी, रा. झाराप, कुडाळ – वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२३; डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर, रा. कुंभारमाठ, मालवण – उद्यान पंडित पुरस्कार २०२३; श्री. महेश रामदास संसारे रा. मांगवली, वैभववाडी – वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२३; आणि श्री. संतोष अंकुश गावडे, रा. रानबांबुळी, कुडाळ – वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२४ यांचा समावेश आहे.
पर्यावरण संवर्धन व सेवाभावी कार्याचा गौरव : विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती तसेच वृक्षारोपण व वृक्षसंगोपनासाठी योगदान दिल्याबद्दल श्री. जोवेल डूमिंग डिसिल्वा, शासकीय कर्मचारी, सध्या कार्यरत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सावंतवाडी नगरपरिषद आस्थापनेमधील सफाई कर्मचारी दिवंगत धोंडू गंगाराम बरागडे, रा. कारीवडे, ता. सावंतवाडी यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांचा वारस मुलगा कु. यश धोंडू बरागडे यास पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच सर्व लाभाची रक्कम व कुटुंब पेन्शन देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत निक्षय पोषण आहार वाटप तसेच क्षयरोग दूरीकरणाच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉ. संजय केसरे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA); डॉ. राजेंद्र पाताडे , अध्यक्ष, डिस्ट्रीक्ट फॅमिली फिजिशियन क्लब (DFC); डॉ. विद्याधर तायशेटे; डॉ. प्रशांत कोलते; डॉ. जी. टी. राणे; आणि श्री. आनंद रासम, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेतल्याबद्दल आरोग्य विभागातर्फे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
