*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम लेख*
*स्त्री संस्कारांची अमृतवेल*
दोन घरांना जोडणारा प्रीतीचा तू सेतू
मूल्यांच्या या बागेमधला सुगंधीत हेतू
कर्तृत्वाचा वारसा तूच पुढे नेणार आहेस
संस्कारांच्या अमृतवेलीवर तूच तर फुलणार आहेस
८ मार्च हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या कर्तृत्वाचा, तिच्या संस्कार संपन्न तेजाचा गौरव करण्याचा दिवस आहे.
महिला संस्कार म्हणजे केवळ घरगुती जबाबदाऱ्या नव्हे, तर ते आहे जीवनाला आकार देणार मूल्यांचे दीपस्तंभ… मुल आईच्या कुशीत खेळत असताना तिच्या ओठातून ओघळते शब्दातून आळवणारी पहिली प्रार्थना… तिच्या स्पर्शातून झिरपणारी माया ….तिच्या कष्टातून उमटणारी जिद्द …हे सारे संस्कार समाजाच्या मनावर कोरले जातात. स्त्री म्हणजे ममता… आणि संकटाच्या वादळातही न डगमगता उभी राहणारी धैर्याची मूर्ती…. तिची छाया कुटुंबाला आधार देते.. तिच्या संयमात सहनशीलतेचा महासागर दडलेला असतो आणि तिच्या हसण्याने आशेचा नवा सूर्य उगवतो.
संस्कार म्हणजे केवळ लादलेली शिस्त नव्हे, तर ती माणुसकीची आणि प्रेमाची अखंड वाहणारी एक अंतर्धारा आहे.. महिला संस्कार म्हणजे आत्मसन्मानाची शिकवण..मुलींना उभारी देणारा आत्मविश्वास..मुलांना संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी समज.. हे स्त्रीच्या हातूनच रुजते. तिच्या ओंजळीतून वाहणारे प्रेम हे केवळ नात्यांना नव्हे, तर संपूर्ण समाजाला समृद्ध करते.
जिथे स्त्री सुसंस्कृत आणि विचारी असते, तिथे तो उंबरा केवळ घराचा राहत नाही तर तो प्रगतीचा आणि वैभवाचा मार्ग बनतो. नम्रता, संयम, आणि क्षमा हे तिचे नैसर्गिक दागिने असून जेव्हा ती हे लेणे लेवते तेव्हा तिचे व्यक्तिमत्व अधिकच दैदिप्यमान दिसते. आजच्या वेगवान आणि आधुनिक युगात स्वतःच्या अस्तित्वाची प्रखर ओळख जपत असतानाच, आपल्या मूल्यांचा आणि परंपरेचा आदर करणे हाच तिचा खरा संस्कार आहे. शिक्षणामुळे तिची बुद्धी प्रगल्भ झाली असली तरी संस्कारांमुळे तिचे हृदय विशाल झाले आहे. संकटाच्या वादळात जेव्हा ती ढाल बनून उभी राहते, तेव्हा तिचे धैर्य तिच्या सुसंस्कृत मनातूनच येते. ती जेव्हा सण उत्सव साजरे करते, तेव्हा ती केवळ रूढी पाळत नसते तर नात्यामधला गोडवा आणि जिव्हाळा जपत असते. घरातील शांतता, समाधान ,आणि समृद्धी ही सर्वस्वी तिच्याच वाणीतील माधुर्यावर आणि विचारांच्या शुद्धतेवर अवलंबून असते.
सावित्रीच्या लेकी म्हणून घेताना जिद्द आणि सुसंस्कृतपणा यांचा मेळ घालणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. उद्याचा सशक्त भारत घडवायचा असेल तर आजच्या स्त्रीच्या हातातील संस्कारांची शक्ती बळकट होणे आवश्यक आहे.
स्त्री ही संस्कारांची अमृतवेल आहे. निसर्गाने तिच्या हातात संस्कृतीचे रक्षण आणि मूल्यांच्या संवर्धनाचे पवित्र दान सोपविले आहे. घराच्या उंबरठ्यावर लावलेल्या छोट्या दिव्यापासून ते आकाशाला कवेत घेणाऱ्या तेजापर्यंतचा तिचा प्रवास हा तिच्यातल्या संस्कारांच्या बळावर सिद्ध होतो.
ती आई म्हणून बाळाच्या इवल्याश्या हाताला धरते तेव्हा ती केवळ त्याला चालायला शिकवत नसते, तर मूल्यांच्या वाटेवर सन्मानाने जगायला शिकवत असते.
आजची स्त्री शिक्षण, विज्ञान, कला, उद्योग, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करते, पण तिच्या पायात अजूनही संस्कारांची पैंजण निनादते… परंपरेचा सन्मान राखत नव्या युगाला कवेत घेण्याची ताकद तिच्यात आहे.
आज आपण प्रत्येक स्त्रीतील या संस्कार दीपाला प्रणाम करूया. तिच्या त्यागाला …तिच्या स्वप्नांना…तिच्या संघर्षाला… सन्मान देऊया. कारण, स्त्री सशक्त झाली तरच समाज सुसंस्कृत होतो. तिच्या संस्कारांनीच भविष्यातील पिढी घडते. स्त्री म्हणजे केवळ नात्यांची ओळख नाही ती स्वतःमध्ये एक विश्व आहे. संस्काराने उजळलेलं.. प्रेमाने सजलेलं..आणि धैर्याने परिपूर्ण असे एक अद्वितीय विश्व..!
नभाला गवसणी घालणारं तिचं कर्तृत्व
संस्कारांच्या शिदोरीतून जपले तिने स्वत्व
नमन त्या शक्तीला जी घराला घरपण देते, या युगाचे नेतृत्व करते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगाला उद्धारी.
सावरते घराला, सावरते देशाला
मानाचा मुजरा आजच्या नारीला..
सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
