राष्ट्रीय सुरक्षेसाठी तातडीची पावले; मंत्री नितेश राणे यांचे स्पष्ट निर्देश
मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तीर्ण किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘AI’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) युक्त सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या कामाला तातडीने गती द्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना केल्या.
विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्रकिनारी भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
बैठकीत आयटी विभागाचे अधिकारी विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. प्रस्तावित प्रणाली ‘AI’ तंत्रज्ञानावर आधारित असून, बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवणे, सागरी गुन्ह्यांना आळा घालणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मंत्री राणे यांनी दिले. सिंधुदुर्गची भौगोलिक स्थिती आणि लांब पसरलेली किनारपट्टी लक्षात घेता सुरक्षेची मजबूत यंत्रणा उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
किनारपट्टी सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणतीही दिरंगाई न करता काम सुरू करण्याचा निर्धार शासनाने व्यक्त केला आहे.
