You are currently viewing इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची सक्रिय उपस्थिती
Oplus_16908288

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची सक्रिय उपस्थिती

जागतिक एआय रोडमॅपचा सखोल आढावा; महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या नवकल्पनांचे कौतुक

Google ‘Health AI’ मॉडेल्सची पाहणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही परिषदेत सहभाग

नवी दिल्ली :

नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक शिखर परिषदेत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा घेतला.

सोमवारपासून सुरू झालेल्या सहा दिवसीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. २० हून अधिक देशांचे प्रतिनिधी, ५०० पेक्षा अधिक जागतिक एआय तज्ज्ञ, तंत्रज्ञान उद्योजक आणि धोरणकर्त्यांच्या सहभागामुळे ही परिषद भारताच्या डिजिटल नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहे.

महाराष्ट्र स्टॉलला भेट; स्टार्टअप्सचा गौरव

परिषदे दरम्यान मंत्री राणे यांनी महाराष्ट्र स्टॉलला भेट देऊन राज्यातील स्टार्टअप्स, संशोधन प्रकल्प आणि डिजिटल उपक्रमांची माहिती घेतली. महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

उद्योग, आरोग्य, शेती, मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन या क्षेत्रांत एआयचा प्रभावी वापर करून राज्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गुगलच्या ‘Health AI’ सादरीकरणाला भेट

परिषदेत Google च्या बूथला भेट देत मंत्री राणे यांनी ‘Health AI’ मॉडेल्सचे सादरीकरण पाहिले. महाराष्ट्रस्थित स्टार्टअप DimensionNXG यांच्या भागीदारीत विकसित करण्यात आलेल्या या मॉडेल्समुळे AIIMS सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

‘X’ या सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना मंत्री राणे म्हणाले, “AI मुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत मोठी क्रांती घडू शकते, याचे प्रभावी उदाहरण येथे पाहायला मिळाले. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान निर्मितीत महाराष्ट्रातील स्टार्टअप्स आघाडीवर असल्याचा अभिमान वाटतो. ही परिषद भारताच्या डिजिटल भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात भक्कम पायाभरणी केली असल्याचे सांगितले.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ ही परिषद भारताला जागतिक एआय हब बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा