*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे वि ग सातपुते लिखित “निर्मोही प्रीत” कवितेचे लेखिका कवयित्री सौ.गौरी चिंतामणी काळे यांनी केलेलं रसग्रहण*
*निर्मोही प्रीत*
〰️〰️〰️〰️
निर्मोही प्रेम करीत राहिलो
याचना कधीच केली नाही
प्राक्तन भाळीचे झेलीताना
भावकळ्यांना तोडले नाही
प्रीतपुरा दो समांतर किनारे
डुंबताना काही वाटले नाही
अजुनी प्रवाही वाहतो आहे
जीवा कशाचीच चिंता नाही
भेटेल कधीतरी इप्सित एकदा
उदास मी कधी झालो नाही
आत्मविश्वासाचा संयम अंतरी
प्रीतभाव कोमेजणार नाही
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*विगसा*
*२९ जानेवारी २०२६*
*निर्मोही प्रीत*
जीवनावर व कवितेवर निस्सीम निरपेक्ष प्रेम करणाऱ्या कविचे मनोगत मांडणारी आदरणीय वि.ग सातपुते सरांची ही सुंदर भावकविता.
प्रेम ही एक पवित्र व्यापक भावना आहे.प्रेम कुणावर ही करावं.प्रीतीला वयाचे ही बंधन नाही.त्याची विविध रुपे..विविध रंग..प्रेम जसे मोह व आसक्ती तसेच प्रेम म्हणजे त्याग ,समर्पण व भक्ती.
या कवितेचे शीर्षक *निर्मोही प्रीत* मात्र संदेश देते कि मानवाने आयुष्यात मोहात न अडकता निरपेक्ष प्रेम करावे.मोह असला कि इच्छा अपेक्षा वाढतात.अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत कि मन दुःखी होते.मोह मनात निर्माण होणे हेच दुःखाचे कारण ठरते.
आपला जीवन प्रवास मांडताना कविवर्य म्हणतात…मी जीवनावर व तसेच कवितेवर निस्सीम निस्वार्थ प्रेम करत राहिलो व आज ही करत आहे.जे मिळाले ते स्वीकारले त्यातच समाधान मानले पण *याचना कधीच केली नाही*.
याचक होणे म्हणजे आपला आत्मसन्मान ,आपले स्वत्व गमावणे जे मी कधीच केले नाही.
*प्राक्तन भाळीचे झेलीताना*
*भावकळ्यांना तोडले नाही.*
आपल्या अलंकारिक शब्दांत आदरणीय अप्पा जीवनाचे शाश्वत सत्य कथन करतात.मनुष्य जन्म घेतल्यावर ईश्वर आपले प्रारब्ध ठरवतो व त्याशिवाय इथून सुटका नसते.कविवर्य म्हणतात माझ्या नशिबात जे सुख दुःख लिहिले होते त्याचा स्वीकार करुन नेहमीच ताठमानेने जगलो.माझ्या आयुष्यात जे काही बरे वाईट प्रसंग आले ,मी अनुभव घेतले त्यांनीच माझे भावविश्व समृद्ध केले.त्या भाव भावनांना मी शब्द रुप देत गेलो व माझ्यातील कवि लेखक घडत गेला.माझ्या मनीचे गूज अर्थात या *भावकळ्या* कधीच कोमेजल्या नाहीत.येथे श्री. वि.ग. सातपुते सर आपले शब्द व रचनांना भावकळ्या असे संबोधतात.इथे उत्प्रेक्षा अलंकाराचा सुंदर वापर झाला आहे.
*प्रीतपुरा दो समांतर किनारे*
*डुंबताना काही वाटले नाही.*
या दोन ओळींत आदरणीय वि.ग.सा. अप्पांनी या संसारासाठी *प्रीतपुरा* या रुपकाचा खुबीने वापर केला आहे.
प्रेम ही जगात अत्युच्च भावना.प्रेमाशिवाय जग चालेल का ? अशा या जगाचे दोन समांतर किनारे आहेत जन्म व मरण.कविवर्य म्हणतात मी जन्म घेऊन ऐलतीरावरुन प्रवास सुरु केला आहे व मी आनंदात डुंबत आहे.जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे.तसेच मी शब्दांच्या सागरात ही विहार करत आहे.मला लाभलेली शब्द मौक्तिक हा अनमोल ठेवा आहे.माझ्या रचना ,माझे शब्द मला आनंद देतात. कुठेतरी पैलतीरी ..हा शब्द प्रवास व माझे जीवन थांबणार आहे तरी आज मला कशाचीच चिंता नाही.
माझा आनंददायक प्रवास सुरुच आहे कारण मी निरपेक्ष प्रेम करतो जगावर ,माणसांवर व माझ्या रचनांवर.
*भेटेल कधीतरी इप्सित एकदा*
*उदास मी कधी झालो नाही*
इथे ही रचना अध्यात्माकडे वळते.या ओळीत आदरणीय विगसा अप्पा परमेश्वर भेटीची इच्छा व्यक्त करतात.तसेच तो क्षण निश्चित येईल असा दृढ विश्वास ते व्यक्त करत आहेत.
प्रेम हे मनुष्याला एका उच्च पातळीवर घेऊन जाते .जर ईश्वरावर खरे प्रेम निर्माण झाले तर मनुष्य तन मन धनाने त्याला समर्पित होतो.ईश्वरीय प्रेमामुळे स्वतःकडे पहायची नवीन दृष्टी मिळते.मनात आत्मविश्वास वाढतो कारण मानवाला हे कळते कि ईश्वर सतत आपली सोबत करणार आहे. कालांतराने मोह व आसक्ती हळूहळू लोप पावते.कविवर्य म्हणतात शांत संयमी जीवन जगताना आता मनात उरली फक्त *निर्मोही प्रीत*. ह्या नश्वर जगात हेच शाश्वत सत्य आहे व माझी ईश्वरावर श्रद्धा व प्रीती अशीच अचल राहणार आहे.
*सौ. गौरी चिंतामणी काळे.*
