सावंतवाडी कारागृहाजवळ धडक; पर्यटकाची कार दुचाकीवर आदळली, तिघे जखमी
सावंतवाडी
येथील कारागृहाजवळ आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका पर्यटकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात केला. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर कारचालकाने थांबण्याऐवजी घटनास्थळावरून वेगाने पलायन केले, मात्र नागरिकांनी सतर्कता दाखवत पळून गेलेली कार गवळी तिठा येथे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कारागृहाजवळ कारने दुचाकीला धडक दिल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अपघातानंतर कारचालक पळून गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते साई राऊळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढाकार घेतला आणि जखमींना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती. गवळी तिठा येथे कार पकडल्यानंतर आता पोलीस चालकावर पुढील कारवाई करत आहेत. या अपघाताचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.
