माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे
पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी
सावंतवाडी
माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जो विकासाचा वारसा जपला, तोच वारसा पुढे नेण्यासाठी विक्रांत सावंत समर्थ आहेत. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः घेतो,” अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यातील माजगांव जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत, तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सचिन बिद्रे आणि उत्कर्षा गांवकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजगांव येथील सिद्धिविनायक सभागृहात ही सभा
आयोजित करण्यात आली होती.
*या मतदारसंघाची ९० टक्के मॅच रेश्मा सावंत यांनीच जिंकली*
विकासाच्या मुद्द्यावर भाष्य करताना नितेश राणे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या कार्याचा गौरव केला. राणे समर्थक काय ताकदीचे असतात, हे रेश्मा वहिनींनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून त्यांनी जिल्ह्यात विकासाची जी घोडदौड सुरू केली होती, ती वाखाणण्याजोगी आहे. खरं तर त्यांनी केलेल्या कामामुळे ९० टक्के निवडणूक आपण आधीच जिंकलो आहोत, असे प्रतिपादन ना. राणे यांनी केले.
*’निधीच्या चाव्या महायुतीकडेच*’
विरोधकांवर कडक शब्दांत टीका
करताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या केंद्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत सर्वच सत्ताकेंद्रे महायुतीच्या ताब्यात आहेत. विकासासाठी लागणाऱ्या निधीच्या सर्व चाव्या आमच्याकडे असल्याने या भागाच्या प्रगतीसाठी पैशांची कमतरता भासणार नाही. ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून ती पूर्णपणे एकतर्फी झाली आहे.
या सभेला माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा बँक संचालक मनीष दळवी, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी, उमेदवार विक्रांत सावंत, सचिन बिद्रे, उत्कर्षा गांवकर, श्याम कासार, महेश धुरी, मधुकर देसाई यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
