You are currently viewing प्रजासत्ताक

प्रजासत्ताक

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*

भाग: ५०

*प्रजासत्ताक*

काकल्या आणि मी दरवर्षी २६ जानेवारीला झेंडावंदनासाठी आमच्या मराठी शाळेत जातो. यंदा मी एकटाच गेलेलो, कारण काकल्या मागच्या आठवड्यात आपल्या मुलीकडे गेलेला. तो तिकडून आल्या आल्याच माझ्याकडे आला.

“अवनू आमचा रवला. तुया गेल्लंय मा झेंडावंदनाक?” येता येता काकल्याने प्रश्न टाकला. मी हो म्हणालो. तसं काकल्याने विचारलं, “झेंडो फडकायल्यात काय उभारल्यात?” काकल्याच्या बोलण्याचा रोख मला कळला, त्यामुळे मी फक्त हसलो.

“बोल मरे. पंधरा ऑगस्टाक उभारतत आणि सव्वीस जानेवारीक फडकायतत असा आयकलला हा. तसाच आसता, काय दोनय टायमाक तुमी फडकायतांस? “काकल्या अजून डिटेलमधे गेला. तो तसे बरोबर बोलत होता. यात पण परंपरा होतीच.

१५ ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीशांचा ध्वज खाली उतरवून आपल्या तिरंग्याचे प्रथम ध्वजारोहण झाले आहे; तर २६ जानेवारी १९५० ला ध्वज होताच; तो फडकवला गेला, ध्वजवंदन केले गेले. हे सर्व काकल्याला माहीत असते अन् आम्ही कुठे चुकतो त्याकडे त्याचे बोट असते. मी काही बोलत नाही हे पाहून तो पुढे सरकला.

“मुळात प्रजासत्ताक हुंजे काय ह्या गावात कितके जणांक म्हायेती हा? संविधान-संविधान करतत, त्येंका तरी ‘संविधानात काय हा’ ह्या म्हायत हा काय? काय संविधान हुंजे फक्त आरक्षण, आपले ह्क्क इतक्याच? कर्तव्याचा काय?” काकल्या उद्वेगाने बोलत राहिला.

“झेंडे कसले फडकायतास? सुटये कसले दितास ?” काकल्या जोरात बोलला. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.

“बरं, मग काय करावं असं तुला वाटतं?” मी विचारलं.

काकल्या सावरत म्हणाला,” १५ ऑगस्टाक ध्वज फडकाया, देशाची गाणी गाया. राष्ट्रपुरुषांची आठवण काढा. पून २६ जानेवारीक संविधानार लक्ष ठेवचो. निस्ता झेंडावंदनार थांबता ने. सुटये न दिता संविधान वाचून घेया, ता सोप्या करून समजावन् सांगा. संविधान ह्या पूजेचा पुस्तक न्हय. गंमत हुंजे बरेचजण हाली संविधानय फडकायतत.” काकल्या जाळ ओकून जायला उठला.

“आणखीन याक सांगतय. तुमी मोठे लोक सणाक घरोघर सामायन्, शिधो, साडये पोचयतास मां? तसा सव्वीस जानेवारीक संविधानाची एक प्रत घराघरात पोचया. केवातरी कोणतरी येखादो वाचीत.” सोबत आणलेली त्याची टोपली डोक्यावर घेऊन काकल्या जायला निघाला; त्या टोपलीत संविधानाच्या प्रती असल्याचा मला भास झाला.

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा