मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान, मतमोजणी व कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन व अंमलबजावणीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २९ऑक्टोबर २०२५ च्या पत्रानुसार आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
मतदार चिठ्ठी वाटपाबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकारी यांनी मतदारांना चिठ्ठी मिळाली आहे की नाही याची खात्री करून मार्क कॉपी नियमानुसार तयार करावी. मतदान साहित्य वेळेत व योग्य प्रमाणात वितरित झाले आहे का, याची खात्री करण्यावर भर द्यावा. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. ईव्हीएम मशिन्स तपासणी, END बटन बंद करण्याच्या सूचना, मतदानाच्या दिवशी सर्व मतदानर केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी 6.30 मॉकपोल (अभिरुप मतदान ) घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये मार्कर पेन ऐवजी पारंपरिक पध्दतीने न मिटणारी शाई बोटांना लावण्यात येणार आहे. प्रति मतदान केंद्र तीन इंक बॉटलचे वितरण तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी श्रेत्रीय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक कार्यवाहीची पडताळणी करणे, मतदानानंतर नोंदविलेल्या मतांचा हिशोब ठेवण्यासाठी व्ही.एम.-३ नमुन्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना प्रशिक्षण पूर्ण करणे, आवश्यक फॉरमॅट व अहवाल नमुने तयार ठेवणे, टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची तयारी, निकाल प्रसिद्धीसाठी डिस्प्ले बोर्डची व्यवस्था, मतमोजणी केंद्राची सुरक्षितता व प्रवेश नियंत्रणाचे सविस्तर नियोजन झाल्याचे नमूद केले. मतमोजणी कर्मचारी व पर्यवेक्षकांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून सीसीटीव्ही, वीजपुरवठा व आपत्कालीन सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या.
००० ०००
