*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा. लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित सामाजिक लेख*
*श्रमदानातून सामाजिक विकास काळाच्या आड जाताना*
श्रमदान भारतीय संस्कृतीतला एकोप्याचा,समाजाच्या विकासाचा, संघटितपणाचा सौंधार्याचा ठेवा होता.आणि यांसच श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जायचं.
आपण श्रमदानाच्या अनेक आख्यायिका पाहिल्यात, ऐकल्याही आहेत.म्हणे हे मंदिर रातोरात बांधलं आहे.ही वास्तू राक्षसांनी एका रात्रीत बांधली आहे. हे मंदिर पाची पांडवांनी एका दिवसात बांधलं आहे.म्हणजे त्या काळी श्रमदान करणारी संस्कृती, समाज आणि विचार होता.कोणतंही सामाजिक कार्य हे सर्वांच्या सहभागातून व्हायचं. तेथे रोजगार, जेवण,मजुरी हा प्रकार कदापिही नव्हता.ती समूहाची गरज, समूहाचा निर्णय म्हणून त्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हायची. म्हणून हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीतला श्रमदानाचा ठेवा जतन केल्याचे,संगोपन केल्याचे, संरक्षण केल्याचे दिसते आहे.म्हणून प्रार्थना स्थळे,गड किल्ले, मोठमोठ्या वास्तु,लेण्या,गडी,वाडे अशा अनेक वास्तू आज अभेद्य म्हणून आपणास पाहावयास मिळतात.एखादा निर्णय झाला की तो समूह एकत्र यायचा.आणि माझं म्हणून कष्ट करायचा. जीव लावायचा. प्राण ओतायचा.लोकांच्या सहभागातून बांधलेल्या हजारो वर्षाच्या वास्तू सुद्धा आज अजरामर झालेल्या आहेत.आणि त्या आपनास आजही पहावयास मिळतात.
गेल्या शंभर वर्षाचा जरी आपण विचार केला तर आपणास असे दिसते की शेताकडे जाणारे रस्ते,गावातली प्रार्थना स्थळे,किंवा धर्मस्थळे,चावड्या,शाळा ज्या ज्या सामूहिक उपयोगाच्या वास्तु त्या सर्व लोक एकत्र येऊन बांधायचे. त्याची सजावट करायचे. त्याचं संरक्षण करायचे.त्या सर्व वास्तू ह्या माझ्या गावच्या वाटायच्या आणि त्याचं तेवढ्याच सकारात्मक भावनेने जतनही केलं जायचं. त्याचं पावित्र्यही टिकविलं जायचं. त्या सोबत गावातील रस्ते, वृक्ष लागवड, पाणवटे, विहिरी,बारवा,शाळा,चावड्या हे सर्व समूहाने एकत्र येऊन ते तयार केलं. जायचं आणि त्याचं जतनही केलं जायचं.ती त्या काळाची गरज होती.सरकार नावाचं कुठलंही पात्र तुमच्यासमोर उभा नव्हतं.
देशाला स्वातंत्र्य मिळालं.मग देश चालवायचा झाला तर टॅक्स हवा. मग त्याची पद्धत सुरू झाली. जमा झालेल्या टॅक्सच्या माध्यमातून गाव विकासाला मदतीचं स्त्रोत उभ राहिलं.खरा विचार केला तर लोकांनी वर्गणी जमा करून बांधलेली वास्तू आणि सरकारनी लोकांच्याकडून पैसे घेऊन केलेली मदत ही सारखीच आहे की नाही.कोणताही विरोधाभास असण्याचे कारण नाही.. यातून काय घडलं तर हे सगळं सरकारने करावं. ती सरकारची जबाबदारी आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली.आणि गावाचं गावपण, गावाचा येकोपा, सामूहिक उपयोगाची साधने, प्रार्थनास्थळे, शाळा, पानवटे, विहिरी,बारवा हे सर्व सर्वांच्याच गरजेचं असून सुद्धा लोकांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे. तरीही लोक त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे आता कोणीही पाहायला तयार नाही.मग हे कोणी करावं? तर ते सरकारने करावं.आमदार खासदाराने करावं. आपण मात्र फक्त भांडत राहावं. बघ्याची भूमिका घ्यावी.उदाहरणार्थ पहायचं झाल्यास कधी कधी प्रचंड मोठा दुष्काळ पडतो. गावाला पाणी मिळत नाही.सगळ्यांची तडफड होते. प्रत्येक जण आपापल्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी धावतो. परंतु सर्व गाव एकत्रित येऊन एखादा पानवाठा दुरुस्त करायला पाहिजे अशी कोणाच्याच मनात इच्छा होत नाही. चर्चा होत नाही. आणि समूहाने निर्णय घेण्याचा तर विषयच उरत नाही. मग मोर्चे, आंदोलने, निघतात. घेराव घातले जातात.मंत्र्याच्या गाड्या अडवल्या जातात.रस्ते अडवले जातात. जमल्यास राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान जाळपोळ केली जाते.
खऱ्या अर्थाने जे करायला हवं ते न करता राष्ट्राच्या नुकसानीचं कार्य तत्परतेणे केले जाते. आणि जे तातडीने समूहाने करायची आवश्यकता आहे,त्याकडे दुर्लक्ष केले जाते.आणि लोक सरकारवरती विसंबून राहतात.
यातून श्रमदान नावाचा विषय बाजूला सारून विषयाचं राजकारण केलं जातं.यास फक्त समाजच कारणीभूत नाही तर सरकार आणि निवडून गेलेले लोक हे मूळ कारणीभूत आहेत.घोषणांचा बाजार मांडून माणसांना आळशी बनवलं गेलं.लोक सरकारवर विसंबून राहायला लागले.यातून गावाचं सौभाग्य,गावाच्या वास्तु, या दुरापास्त होऊन गेलेल्या दिसतात.गावांच्या गरजा ह्या सरकारवर आणि निवडून दिलेल्या लोकांच्या अंगावरती फेकून देऊन लोक निर्धारस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
एका बाजूला प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहें. विकास कामातला पैसा हा वाटण्या करण्यात संपून जातो.राजीव गांधी पूर्वी आपल्या भाषणात म्हणायचे 100% विकासावरती आलेला निधी तो 70% वाटण्यात जातो. आणि 30 टक्के रक्कम प्रत्यक्षात विकासावरती खर्च होते. हा एवढा मोठा भ्रष्टाचार निपटणे ही काळाची गरज आहे. परंतु तसे होताना आता देशात दिसत नाही. निवडून यायचं आणि देशाला लुटायचं एवढाच विचार आता राजशक्तीमध्ये नशा यावी असा भिंगत गेल्याचे दिसते आहे.आणि यातूनच खऱ्या अर्थाने विकासाची अधोगती निर्माण झालेल्या आहेत. एका बाजूला लोकसहभाग बंद झाला. सामूहिक कृती बंद झाली. सामूहिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांचं श्रमदान बंद झालं.आणि दुसऱ्या बाजूला पैसा गावापर्यंत पोहोचत नाही लं.गावाच्या समाजाच्या विकासाला खिळ बसली.
आजच्या कार्यकालाचा विचार केला तर श्रमदान नावाचा शब्द काळाच्या ओघात मागे केव्हाच निघून गेला हे आज कोणालाही आठवत नाही.
रस्त्यावर खड्डे पडतात.गतिरोधक मात्र मजबूत दिसतात.नाल्या ब्लॉक होतात. दुर्गंधी सुटते.जुन्या शाळा,जुनी प्रार्थना स्थळे उध्वस्त झालेली आहेत. त्याकडे कोणाचही लक्ष लागल्याचं दिसत नाही.
ज्या शाळेतून आपण क्लासवन, क्लास टू अधिकारी बनलो, माणूस बनलो, त्या शाळा उध्वस्त झालेल्या आहेत. त्याच्या विकासावरती एकही रुपया समूहातून एकत्रित केला जात नाही. हे या देशाच्या अधोगतीचे लक्षणच आहे,असेच म्हणावे लागेल.तर दुसरीकडे लक्ष वेधत असताना ज्या शिक्षणातून देश सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि आर्थिक विकासाकडे वळतो त्याचं मुख्य केंद्र आहे शिक्षण.ते मागे पडताना दिसत आहे. आणि धार्मिक स्थळांच्याकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. आणि तीही प्रार्थना स्थळे ही सुरक्षित दिसत नाहीत.जातीत, धर्मात तान तनाव होताना दिसतो आहे. खऱ्या अर्थाने श्रमदानातून शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. श्रमदानातून अभ्यासिका उभ्या राहिल्या पाहिजेत लं.ते आज होताना दिसत नाही. तर सोन्याची प्रार्थनास्थळे उभी राहताना दिसतात. लोक लोकांच्या गरजा या राजसत्तेकडे मागणी घालायच्या ऐवजी प्रार्थनास्थळे बांधण्याच्याकडे लोकांचा कल जास्त दिसून येतो आहे.
हे बदलण्याची आवश्यकता आहे. समाजामध्ये प्रचंड मोठी वृक्षतोड झालेली आहे.ते पुन्हा लावणे, त्याचं संवर्धन करणे, रस्ते नाल्या सामूहिक विकासाची कामे, जलस्त्रोत वाढविणे, संवर्धन करणे ही लोकांच्या श्रमदानावरती व्हायला हवीत.कारण तिथे प्रत्येक माणसाचं श्रमाअर्पण झालेलं असतं. ते मजबूत असतं.आणि त्यातूनच एकोपा समाजासमोर ठेवण्यासाठी आदर्श विचार,आदर्श कृती म्हणून ती समाजासमोर उभी राहते.
गरज आहे समूहाने कृती करण्याची.गरज आहे वृक्ष संवर्धन करण्याची.गरज आहे परिपूर्ण गावच्या सहभागातून गावच्या विकासाची.याच्यासाठी प्रत्येक गावाने पुन्हा एकदा नव्याने एकोप्याने,संघटितपणे, सर्वांच्या मदतीतून नवविश्व साकारण्याची.
येणारा काळ कोणता विचार येऊन पुढे जाईल हे मात्र डोळसमनाने पाहण्याची आवश्यकता आहे.आपण फक्त बघ्याची भूमिका घेतली तर समाज असाच वाहत जाणार आहे. विकासाच्या टप्प्यावरती प्रत्येकाला त्याच्या झळा सोसाव्या लागतील आणि तसे होणे देशाच्या राष्ट्राच्या हिताचं होणार नाही.चला तर येणारा नवाकाळ 22 व्या शतकाकडे जाताना समाज,राष्ट्रीय ऐक्य,सर्व धर्म समभाव आणी मानवी मूल्य घेऊन चालत राहणारा निर्माण होईल काय पहायला तर आपल्यालाच लागणार आहे..
