You are currently viewing सिंधुदुर्गातील शून्य शिक्षक शाळांमध्ये तात्काळ शिक्षक भरतीसाठी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी पंचायत समिती समोर निदर्शने

सिंधुदुर्गातील शून्य शिक्षक शाळांमध्ये तात्काळ शिक्षक भरतीसाठी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी पंचायत समिती समोर निदर्शने

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “त्या” १२१ शून्य शिक्षक शाळांमध्ये तात्काळ शिक्षक भरती करा, किंवा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी. एड धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्या, मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा, या मागणीसाठी आज ठाकरे शिवसेनेच्या वतीने सावंतवाडीत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री जिल्ह्यातील असून सुद्धा शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लागत नाही ही लांच्छनास्पद बाब आहे. जिल्हयातील डी.एड बेरोजगारांचा प्रश्न महिन्याभरात सोडविण्याचे आश्वासन आंदोलनादरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले होते. मात्र त्यांनी तो अद्याप दोन महिने उलटले तरी सोडविला नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसात योग्य तो निर्णय न झाल्यास “त्या” शाळा मधील विद्यार्थ्यांना पंचायत समितीमध्ये आणून बसवू आणि याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू, असा आक्रमक इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हा महिला प्रमुख जानवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, महिला तालुकाप्रमुख भारती कासार, उल्हास परब, श्रुतिका दळवी, उदय पारिपत्ते, रमेश गावकर, अशोक धुरी, संदीप प्रभू, योगेश गोवेकर आदींसह मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पडते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० शिक्षक पर जिल्ह्यात काम करत आहेत. तर जिल्हाअंतर्गत बदलीतून ४५३ शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १२१ शाळांमध्ये शून्य शिक्षक आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. खरंतर जिल्हांतर्गत शिक्षक बदली करताना पहिल्यांदा या ठिकाणची शिक्षक पदे भरली पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. तर दुसरीकडे शिक्षण मंत्री केसरकर हे आपल्या जिल्ह्यातीलच असून जिल्ह्यातील शिक्षण यंत्रणेची अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण होणे ही बाब लांचनास्पद आहे. जिल्ह्यातील डी.एड बेरोजगारांनी केलेल्या आंदोलनानंतर महिन्याभरात प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी डी. एड बेरोजगार धारकांना दिले होते. मात्र आज दोन महिने उलटले तरी त्यांनी तो प्रश्न सोडविला नाही. तसेच केसरकर जिल्ह्यातील असल्यामुळे खास बाप म्हणून जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न ते सोडवू शकले असते, मात्र त्यांनी ते देखील केले नाही. आता त्यांनी निदान जिल्हा परिषदच्या सुवनिधीतून तरी जिल्ह्यातील डी. एड धारक बेरोजगारांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्यावे. आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी त्यांनी केली. तर येत्या दहा दिवसात शिक्षक भरतीचा प्रश्न न सुटल्यास शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शून्य शिक्षकी शाळातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीत आणून बसविले जाईल, असा इशाराही त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या वतीने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा