You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सावंतवाडीत नागरी सत्कार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सावंतवाडीत नागरी सत्कार

*माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी उपस्थित केले दीपक केसरकर यांच्यासमोर प्रश्न..*

 

सावंतवाडी :

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाते म्हणजे विळा भोपळ्याचे नाते होय, दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्या मधला उभा संघर्ष गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय. नारायण राणे यांचा जिल्ह्यात असलेला राजकीय दहशतवाद हा मुद्दा उपस्थित करून दीपक केसरकर यांनी जनतेची सहानुभूती मिळवली आणि याच सहानुभूतीच्या जोरावर नारायण राणे यांच्या राजकीय दहशतवादाचा विरोध करत दीपक केसरकर तीन वेळा आमदार झाले आणि दोन वेळा महाराष्ट्राच्या विधीमंडळात मंत्रीपदी देखील विराजमान झाले. मंगळवार दिनांक 6 जून रोजी सकाळी दहा वाजता सावंतवाडी येथील गेली अनेक वर्षे विविध नेत्यांकडून उद्घाटने होऊनही आज मितीपर्यंत काम सुरू न झालेल्या संत गाडगेबाबा मंडईचे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होत असून त्याच ठिकाणी सावंतवाडीतील प्रसिद्ध जयप्रकाश चौकात सावंतवाडी वासियांकडून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे.

या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह अनेक मंत्री आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. गेली अनेक वर्षे दीपक केसरकर व नारायण राणे यांच्यातील नाते सिंधुदुर्ग वासिय आणि खास करून सावंतवाडी वासिय अगदी जवळून पाहत आहेत. नारायण राणे यांचा राजकीय दहशतवाद जनतेच्या समोर आणून जनतेच्या न्यायालयात न्याय मिळविणारे दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यांदाच सावंतवाडीवासियांच्या समोर एकच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. हीच संधी साधून एकेकाळीचे दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक बबन साळगावकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या समोर पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. यातील पहिला प्रश्न म्हणजे दीपक केसरकर हे राष्ट्रवादीमध्ये असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सावंतवाडी जिमखाना मैदानावरील सभेमध्ये दीपक केसरकर यांनी आक्षेप घेण्याचे कारण कोणते होते..? जर सहा जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर नागरी सत्कार सोहळ्याच्या सभेत एकाच व्यासपीठावर नाम.नारायण राणे यांच्यासोबत बसणे नाम.दीपक केसरकर यांना अवघड जात नसेल तर शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत दीपक केसरकर यांना नारायण राणे यांच्यासोबत बसणे का अनुचित वाटत होते..?

दहशतवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या माणसाचा प्रचार आपण करणार नाही असं त्यावेळी नाम.दीपक केसरकर यांचं म्हणणं होतं..मग आता दीपक केसरकर नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसणार..? सोनालीच्या हॉस्टेलवर रवींद्र फाटक यांचे गुंड नारायण राणे पाठवतात असा त्यावेळी दीपक केसरकर भर सभेत आरोप करत होते; डोळ्यात पाणी आणून रडत असायचे. नारायण राणे यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केलात त्याच सन्माननीय नारायण राणे यांच्यासोबत आपण आता कसे काय बसणार..? दहशतवाद हा तुमच्या राजकारणाचा भावनिक भाग होता की काय..? माननीय शरद पवार साहेबांना आपण दहशतवादी नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे सांगून राष्ट्रवादी पक्षापासून हरकत घेतली होती तो दहशतवाद आता संपला की काय..? नारायण राणे यांचे साथीदार रवींद्र फाटक यांचे गुंड सोनालीच्या हॉस्टेलवर यायचे त्याच रवींद्र फाटक यांची आरती ओवाळताना तुम्हाला शरम कशी काय आली नाही..? असे प्रश्न माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी उपस्थित केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिक सत्कार सोहळ्यासाठी स्टेजवर बसण्यापूर्वी दीपक केसरकर यांनी या प्रश्नांची उत्तरे शहरवासीयांना द्यावीत असे आवाहन बबन साळगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eighteen =