You are currently viewing वटपौर्णिमा निमित्ताने (प्रासंगिक लेख)

वटपौर्णिमा निमित्ताने (प्रासंगिक लेख)

*ज्येष्ठ लेखक कवी बाबू फिलिप्स डिसोजा, (यमुना नगर, निगडी, पुणे) लिखित अप्रतिम लेख*

 

*वटपौर्णिमा निमित्ताने (प्रासंगिक लेख)*

 

यंदा ३ जून २०२३ ला वटपौर्णिमा आहे.

ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

याबद्दलची कथा अशी की भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.तरी नारद मुनी यांचे तिने ऐकले नाही व सत्यवानाशी लग्न केले.

सावित्रीने यमाकडून वरदान मिळवून सत्यवानाचे प्राण वाचविले ही पुराणकथा परंपरेने आपण ऐकत आलो. वटवृक्षाखाली हे सर्व घडले म्हणून तिच्या पातिव्रत्याच्या आठवणींचा सोहळा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाखाली होणारी पूजा. यावेळेस सौभाग्य लेणे अर्पिले जाते. पतिनिष्ठा आणि पति प्रेमाची साक्ष म्हणजे ही पूजा. पहाटे शुचिर्भूत होऊन ही पूजा केली जाते. महिला या निमित्ताने उपवास करतात. दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. शंकर किंवा विष्णू ची आराधना केली जाते.

विवाहित स्त्रिया सावित्री ची प्रार्थना करतात.

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।

वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

थोड्याफार फरकाने वटवृक्ष या दिवशी भारतात सर्वत्र पूजला जातो. पतीच्या सौभाग्याचे दान मागितले जाते. शहरात बागांशिवाय वटवृक्ष सहसा आढळत नाही. म्हणून त्याच्या फांद्या कापून आणून त्या विकल्या जातात.

पर्यावरण दृष्टीने वटवृक्ष पृथ्वीवर महत्वाचा आहे.

वटवृक्ष खरातर वंशवृक्ष आहे. त्याच्या कोवळ्या पारंब्यांचा अर्क संतान प्राप्ती साठी पुरूष वर्ग सेवन करतो. दीर्घायुषी संतान लाभावे म्हणून हा उपाय अंमलात आणला जातो. वडाच्या सुक्या काठ्यांचा उपयोग होमात समिधा म्हणून होतो. वडाच्या चिकाच्या वापराने केस दाट, काळे होतात. साधु जटा मजबूत करण्यासाठी या चिकाचा उपयोग करतात.

धार्मिक अधिष्ठान असल्याने वड ,पिंपळ, निंब, आंबा वृक्ष यांचे पर्यावरण दृष्टीने आपोआप संवर्धन होते.

 

-बाबू फिलीप डिसोजा

यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा