You are currently viewing महावितरण कंपनी आणखी किती बळी घेणार..?

महावितरण कंपनी आणखी किती बळी घेणार..?

*कंत्राटी वायरमनना वाली कोण..?*

 

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या आरोस गावातील दोन महिन्यांपूर्वीच भरती झालेला कंत्राटी वायरमन अमोल भरत कळंगुटकर (वय २४) आज रविवारी १५ ऑक्टोबला विजेच्या धक्याने जागीच गतप्राण झाला

आरोस नाबरवाडी येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वीज खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असताना विजेच्या तीव्र धक्क्याने वायरमन अमोल कळंगुटकर जागीच मृत्युमुखी पडला. विजेच्या खांबावर चढण्यापूर्वी त्याने बांदा येथील आपल्या वरिष्ठांना फोनवर माहिती दिल्याचेही सूत्रांकडून समजले आहे. सदर विभागातील लाईनचे इन्स्पेक्शन करणारा अधिकारी घटना घडून सहा तास उलटून गेले तरी घटनास्थळी दाखल झालेला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांना वाली कोण..? असा संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत. गेले सहा तास विजेचा धक्का लागून गतप्राण झालेला अमोलचा मृतदेह खांबावरच चिकटलेला असून महावितरणचे अधिकारी व पोलीस गावात दाखल झाल्यावरही जमलेल्या जवळपास दीड हजारांवरच्या जमलेल्या जमावाने युवा वायरमनच्या कुटुंबाला योग्य नुकसान भरपाई देत नाहीत आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मयत युवकाला खांबावरून खाली उतरविण्यास मज्जाव केला. यावेळी महावितरणचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा फोन देखील बंद येत आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत गेल्या काही महिन्यात वायरमन विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडण्याची ही सातवी घटना असल्याने आरोस गावातील गावकऱ्यांनी “महावितरण कंपनी आणखी किती बळी घेणार..?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात जवळपास सात कंत्राटी युवा वायरमनचे विजेच्या धक्क्याने बळी गेले आहेत. महावितरण कंपनीने कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केले आहेत आणि याच नव्याने भरती झालेल्या कंत्राटी कामगारांना नोकरी वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून विजेच्या खांबावर चढून कामे करावी लागतात. अशावेळी वीज वितरण कंपनी त्यांची कोणतीही जबाबदारी घेत नाही. काम करवून घेत असताना नियम पायदळी तुडवले जातात आणि बळी गेल्यावर मात्र नियमांवर बोट ठेऊन बळी गेलेल्या कंत्राटी कामगारांवर, त्यांच्या कुटुंबावर अन्याय केला जातो. जिल्ह्यात महावितरण कंपनीकडे काम करणाऱ्या कित्येक वायरमनना चांगले किट देखील दिले गेले नसल्याचेही समजते आहे. सावंतवाडी तालुक्यात आपले कर्तव्य बजावत असलेल्या कंत्राटी युवा वायरमनना कोणी वाली आहे की नाही..? जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदार केवळ आपली पद आणि प्रतिष्ठा जपत आहेत. राजकीय आखाड्यात उद्या काय करायचे याची प्लॅनिंग करत आहेत आणि डोळ्यादेखत जिल्ह्यातील युवकांचे महावितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे बळी जाताना पाहत आहेत यापेक्षा दुर्दैव ते काय…? जिल्ह्यातील महावितरणच्या दुर्दशेकडे नेते मंत्री संत्री तरी डोळे उघडून पाहणार आहेत का बळी जाताना तमाशाच बघणार आहेत..? असा प्रश्न आज जिल्हावसियांच्या मनात खदखदत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा