You are currently viewing पाडलोसमध्ये शॉर्टसर्किटमुळे काजुबाग जळाली; तीन ते चार लाखांचे नुकसान 

पाडलोसमध्ये शॉर्टसर्किटमुळे काजुबाग जळाली; तीन ते चार लाखांचे नुकसान 

बांदा

पाडलोस केणीवाडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आंबा काजू बागायतीस आग लागली. यात पाच शेतकऱ्यांचे सुमारे तीन एकरावर असलेली 400 ते 500 काजू, आंबा कलमे, बांबूची झाडे असे मिळून तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वीज वितरण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येण्यास नकार दिल्याचे शेतकरी अमोल नाईक यांनी सांगितले.

पाडलोस केणीवाडा येथून वीज वितरणची मुख्य लाईन जाते. गणेश चतुर्थी दरम्यानही याच लाईनवर स्पार्क होऊन चार ग्रामस्थ थोडक्यात बचावले होते. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास केणीवाडा येथील आंबा काजू बागायतीमधून जाणाऱ्या वाहिन्यांवर शॉर्टसर्किट झाले. परिसरात सुके गवत असल्याने आग जलद गतीने पसरली गेली. आग लागल्याचे निदर्शनास येतात शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत शर्तीचे प्रयत्न केले. परंतु वाऱ्याचा वेग मोठा असल्याने आग नियंत्रणा बाहेर गेली अन 400 ते 500 काजू कलमे आगीच्या भक्षस्थानी पडली. शेतकरी मदन कुबल, महादेव नाईक, प्रभाकर कुबल, अमोल कोरगावकर, सप्रेम परब यांचे नुकसान झाले.
शेतकरी अमोल नाईक यांनी वीज वितरण अधिकारी अनिल यादव यांच्याशी संपर्क साधत सविस्तर माहिती दिली. मात्र सुट्टीचा दिवस असल्याने आपण आज येऊ शकत नसल्याचे श्री यादव यांनी सांगितल्याचे अमोल नाईक यांनी सांगितले. तसेच दोन दोन महिने नकाशा मिळत नसल्याने आम्ही करायचे तरी काय असा सवाल श्री. नाईक यांनी अधिकाऱ्यांना केला.
वारंवार असे शॉर्ट सर्किटचे प्रकार होत असून वीज महावितरणचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अशा नुकसानी सामोरे जावे लागत असल्याचे सांगत उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरणवर तीव्र रोष व्यक्त केला.

आग विझविण्यासाठी शेतकरी अमोल नाईक, सप्रेम परब, अमोल कोरगावकर, भूषण केणी, महादेव नाईक, अमित अमरे, ओमकार कोरगावकर, बंटी नाईक, अजित कोरगावकर, संदीप कुबल, प्रभाकर कुबल, गोकुळदास परब, गोविंद पराडकर, सदानंद कोरगावकर, दत्ता आदी ग्रामस्थांनी आग विझविली. भरदुपारी आग विझविण्यासाठी आलेले दोन शेतकरी आगीच्या ज्वाला बसल्याने अस्वस्थ झाले.
दरम्यान, बांदा कनिष्ठ सहायक अभियंता अनिल यादव यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 11 =