You are currently viewing विद्यार्थ्यांच्या हस्ते मुलांच्या जल्लोषात ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ चे प्रकाशन

विद्यार्थ्यांच्या हस्ते मुलांच्या जल्लोषात ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ चे प्रकाशन

तळेरे (प्रतिनिधी) :

येथील लेखक प्रमोद कोयंडे यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ या बालकथासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्रदिनी लहान मुलांच्या जल्लोषात झाले. तळेरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे झालेल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच विद्यालयाच्या सातवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर तळेरेचे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच शैलेश सुर्वे, कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश जाधव, स्व. सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उपाध्यक्ष नारायण वळंजू, स्व. सुनिल तळेकर चरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, माजी सरपंच व शिक्षणप्रेमी शशांक तळेकर, राज्यपालांचे माजी उपसचिव विनायक दळवी, लेखक – छायाचित्रकार विजय जोशी, लेखक चंद्रशेखर हडप, मुख्याध्यापिका पद्मजा करंदीकर, प्रा. हेमंत महाडीक, व्यापारी संघटना अध्यक्ष स्वप्निल कल्याणकर, सदाशिव पांचाळ, संजय खानविलकर, शिक्षकवर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.

सध्याच्या काळात मुले मोबाईलच्या आहारी जात असताना त्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून पुन्हा वाचनाकडे वळविणारी पुस्तके आवश्यक आहेत, त्यादृष्टीने प्रमोद कोयंडे यांचे पुस्तक महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन दिलीप तळेकर यांनी केले. लेखक चंद्रशेखर हडप यांनी मुलांना लहानशी गोष्ट सांगून त्यांना काही क्षण वेगळ्याच विश्वात नेले. लेखक प्रमोद कोयंडे यांनी बालकथासंग्रह लिहिण्यामागची भूमिका स्पष्ट करून यातील कथा कशा सुचल्या ते थोडक्यात सांगितले. या सोहळ्याला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

तळेरे, साळिस्ते शाळेतील मुलांना पुस्तक भेट

माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, डाॅ. मिलिंद कुलकर्णी, सरपंच हनुमंत तळेकर, विनय पावसकर यांच्या दातृत्वातून तळेरे आणि साळिस्ते शाळेने या बालकथा संग्रहाच्या प्रती सर्व विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिल्या. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

यावेळी पद्मजा करंदीकर, सदाशिव पांचाळ, शशांक तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश जाधव, सूत्रसंचालन शिक्षक विभूते तर आभारप्रदर्शन निकेत पावसकर यांनी केले. या प्रकाशन सोहळ्याला डॉ. विजय पोकळे, कवी उमेश यादव, चित्रकार मृण्मयी पांचाळ आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − one =