You are currently viewing महाराष्ट्र दिनानिमित्त जय महाराष्ट्र .. आणि रिफायनरीच्या निमित्ताने, उद्यापासून – हरहर महादेव….!!!

महाराष्ट्र दिनानिमित्त जय महाराष्ट्र .. आणि रिफायनरीच्या निमित्ताने, उद्यापासून – हरहर महादेव….!!!

*महाराष्ट्र दिनानिमित्त जय महाराष्ट्र .. आणि रिफायनरीच्या निमित्ताने, उद्यापासून – हरहर महादेव….!!!*

रिफायनरीबद्दल आजकाल मी जास्त काही का लिहीत नाही, असे मला ओळखणाऱ्या अनेकांची विचारणा असते. “वाघान बघली झाळ काय केडली देखयतत नाळ” अशी एक मालवणी म्हण आहे, ती ही माझ्या मौनाच्या दरम्यान पटायला लागली. मी गप्प बसतोय म्हंटल्यावर अनेक चिरकूट माकडे शहाणपण पाजळायला लागली. मला ते हातचे राखून वगैरे बोलायला आणि फाजील लोकशाही कुरवाळत बसायला आवडत नाही. पण मी बोलायला लागलो तर अनेकांना ते परवडणारे नाही. पाच वर्षांपासून मी रिफायनरीबाबत बोलतो आहे. आज रिफायनरीबद्दल योग्य मुद्दे मांडत समर्थन करणारी अनेक मंडळी कोकणात आहेत, ते पाहता त्यावेळचे श्रम अगदीच वाया गेले असे नाही म्हणता येणार! कारण तो काळ असा होता की रिफायनरीबद्दल एक चांगला शब्द कोणी उच्चारत असेल तर तो कोकणचाच नव्हे, तर अखिल मानवजातीचा शत्रू मानला जायचा. आणि या शत्रूला येनकेन प्रकारेन चिरडायचाच, हा चंग बाळगणाऱ्या टोळ्यांचे राज्य इथे पसरलेले होते. त्यावेळी ज्या पद्धतीने रिफायनरी बदनाम करण्याची मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने राबवली गेली त्याचे अनेक पोस्टर्स माझ्याकडे आजही आहेत. एकेक अजब नमुने होते. त्यात रिफायनरीमुळे नपुसंकत्व कसे येते इथपासून ते पक्षी कसे तेलात लडबडुन मरतील, महाविनाशक स्फोट कसे होतील, माणूस अवयव गळून पडून कसा विद्रुप होईल, याची अगदी प्रोफेशनल पिक्चर्स बनवली गेली होती. वास्तविक शासन आणि प्रशासनाची जबाबदारी होती की केंद्राच्या या प्रचंड मोठ्या, चार लाख कोटी गुंतवणूक असलेल्या आणि कोकणचा कायापालट करून महाविकासाकडे नेण्याची क्षमता असणाऱ्या या प्रकल्पाची योग्य माहिती जनतेला करून देणे. पण यात प्रशासन कमी पडले. या अपप्रचाराला कोकणातील माणसे बळी पडत गेली. विरोध वाढत गेला. हे सगळे वास्तव मान्य करतानाच….

कधीतरी आपण विचार करतो का, की हे कोण करत असेल? कोकण वाचवायला काखेत शबनम बॅग अडकवून लोकांचे आयुष्य उध्दरण्यासाठी येणारे हे “देवदूत” कुठून येतात? त्यांच्या उपजीविकेचे साधन काय असेल? यांच्या येण्याने अचानक समाजातील बुद्धिजीवी वर्ग, विचारवंत कसे जागे होतात? पत्रकार, यु-ट्युबर, सोशल मीडियावर लेखन करणारे या सगळ्यांना “विरोधात लिहिण्यासाठी” कसे प्रवृत्त केले जाते, निरोप देऊन दबावाखाली कसे आणले जाते? आणि मुख्य म्हणजे, प्रकल्प आले की कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवणारे हे तथाकथित शबनमधारक पर्यावरणवादी प्रकल्प रद्द झाला की कुठे गडप होतात आणि पुढचा प्रकल्प आला की अचूकपणे कसे उगवतात? बरे, दरम्यानच्या काळात इथे पर्यावरणाचे शेकडो विषय आहेत, ज्यावर काही ठरावीक लोक काम करत असतात, तिथे कसल्याही प्रकारची मदत करताना हे लोक का दिसत नाहीत?

मागच्या पाच वर्षापूर्वी मी या सगळ्या विषयावर सातत्याने लिहून या बेगडी पर्यावरणवाद्यांचे कपडे फाडून त्यांना उघडे केले आहे. त्यातील लेख आजही उपलब्ध आहेत. मात्र त्यावेळची रिफायनरी विरोधातली तीच खोटी चित्रे, लेख, माहितीपट आजही नाणारनंतर बारसुत तशीच्या तशी प्रसिद्ध होत आहेत. आजही विरोधातल्या अपप्रचाराची मोडस ऑपरेंडी तीच आहे. आजही रिफायनरी विरोधात लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी सोशल मीडियावरील लेखक, यु ट्युबर यांना धमकावले जात आहे. जे रिफायनरीबद्दल चांगले बोलतील ते धनदांडग्यांचे दलाल कसे आहेत हे लिहिण्यास त्यांना भाग पाडणं, त्यांना ट्रोल करणं हे तसंच्या तसं चालू आहे. कितीतरी प्रकार आता उघड होत आहेत.

आणि हे करत असताना आव मात्र असा असतो की कोकणचे जे काही भले करणार तर ते फक्त हेच, बाकी सगळे कोकणचा विध्वंस करायला निघालेले आहेत. त्यांना “सगळ्या अर्थाने” झोडपून काढणे हेच सगळ्या कोकणवासीयांचे धर्मकर्तव्य असले पाहिजे.

अरे मूर्खांनो, कोकण म्हणजे काही तुमच्या बापाची जागीर नाही जे तुम्ही ठरवता तेच व्हायला आणि कोकण म्हणजे काही अडाणी, आदिवासी किंवा जंगली अनपढ लोकांचा प्रदेशही नाही तुम्ही सांगता त्यावर विश्वास ठेवून चालायला. तुमचा तंत्रशुद्ध प्रचंड अपप्रचार आणि विरोधात योग्य बाजू मांडण्यातली प्रशासकीय उदासीनता यातून निर्माण झालेले वातावरण हे तुमचे आजचे यश असेलही. पण लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. त्या भेटत राहतील. पाच वर्षांपूर्वी असल्या शेकडो धमक्या मी पचवल्या. खुनाच्या जाहीर कबुल्या देणाऱ्या रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना आव्हान देत वातावरण पलटवून टाकलं. फक्त, फाजील लोकशाहीमुळे शासनाने त्यावेळी जी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती योग्यवेळी न घेतल्याने नाणारसारखा प्रकल्प कोकणातून बारगळला. होय, बारगळलाच! आजचा बारसु प्रकल्प हा क्षमता कमी असणारा प्रकल्प आहे. एक तृतीयांश क्षमता असणारा हा प्रकल्प कोकणचे किती मोठे नुकसान करून गेला आहे याची कल्पना त्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना नक्कीच आहे. तो त्यांचा विजय असेल, पण कोकणचा पराभव आहे. तरीही, दुर्दैव हेच आहे की कोकणच्या नावावर आजही “एकच जिद्द रिफायनरी रद्द” म्हणत आहे त्या प्रकल्पालाही विरोध चालला आहे.

इन मीन तीस-चाळीस जणांची प्रशिक्षित टोळी असणारे हे तथाकथित पर्यावरणवादी केवळ कोकणवासीयांच्या रिफायनरी बद्दलच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत राष्ट्राच्या विकासाच्या एकेक प्रकल्पाआड येत आहेत. पैशाचे छुपे गैरव्यवहार करत सोशल मीडियावरची प्रचार यंत्रणा विकत घेऊ पहात आहेत, रिफायनरीशी संबंधित उद्योगात नोकऱ्या करून पोट भरणारे पर्यावरण तज्ञ बनले आहेत, आणि अर्धी लाकडे मसणात गेलेल्या लोकांना भडकावून आंदोलनात उतरवले जाऊन त्यांच्या तरुण पिढीचे भवितव्य बिघडवले जात आहे.

फाजील लोकशाही जर विकासाच्या आड येत असेल तर प्रसंगी कठोर होऊन राष्ट्रहित साधण्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. मी सुरुवातीलाच बोललोय की ओठात एक आणि पोटात एक असे ठेवून बोलणारा राजकारणी मी नाही. जे लोकांच्या हिताचे आहे, ते लोकांना समजेल अशाच भाषेत सांगावे लागते. कोकणात काय करायचे हे आम्ही ठरवणार, प्रकल्प नागपूर नाहीतर गुजरातला घेऊन नाही हे बोलणारा उद्दामपणा कधीतरी मोडून काढावाच लागेल.

साधंसरळ पण रोखठोक भाषेत सांगतो. तुम्हाला रिफायनरी नको तर नको, ठीक आहे कोकण तुमचा आहे, तुमचं तुम्ही ठरवणार.

पण, उद्या समजा एखाद्या सरकारने निर्णय घेतला की रिफायनरी असलेल्या क्षेत्राच्या दोनशे मीटर परिघातच रिफायनरी प्रॉडक्ट वितरित केली जातील. पेट्रोल आणि गॅसचा एखाद दुसरा दिवस तुटवडा पडला तर रांगा लावून सरकारला शिव्या देणारे कोकणवासी आम्ही! जर कोकणात रिफायनरी नाही म्हणून पेट्रोल-डिझेल, गॅस यापुढे मिळणार नाही असे जाहीर झाले, तर रिफायनरीच्या मागणीसाठी कोकण पेटेल, असे नाही वाटत? कोकण वाचवा म्हणत खोटी दिशाभूल करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना लोक शोधून काढून काढून कोकणातून वाचवा म्हणायची पाळी आणतील. प्रकल्प गुजरातला पाठवा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस मात्र आम्हाला वेळच्या वेळी मिळाला पाहीजे, किती हा दुटप्पीपणा! एकीकडे आम्ही सारे भारतीय म्हणायचे आणि दुसरीकडे… शिवाजी जन्माला यावेत पण, दुसऱ्याच्या घरी!

कोकणच्या विकासाचे मारेकरी असणारे प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात उतरणारे शबनमधारी पर्यावरणवादी, त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांची प्रचारयंत्रणा, धंदे आणि प्रकल्पाला विरोध करण्यामागची आंतरराष्ट्रीय “सुपारी” याबद्दल आता पुन्हा एकदा बोलण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या स्वार्थाकरता काही लोकांनी कोकणचा तवा तापवला असला, तरीही या नतद्रष्टांच्या भाकऱ्या इथे भाजू देणार नाही. आणि मला धमक्या देणे, ट्रोल करणे असले प्रकार करायला कोणी धजावू नये हे आधीच सांगतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे पुन्हा एकदा सांगतो. आजही मी कोणाला व्यक्तिगतरित्या रडारवर घेतलेले नाही, सत्य जनतेसमोर आणण्यासाठी मी आजपासून या विषयावर प्रबोधनात्मक लेखमाला सुरू करत आहे. पण कोण ट्रोल करायची सुपारी वाजवायला आला तर त्याचे बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. कोकण कोणाच्या वडिलांची जहागिरी नाही, जितके कोकण तुमचे तितकेच ते माझेही! खोटारडे विचारवंत तत्वज्ञानी आणि पेरोलवरचे बाहुबली विरोधक या सगळ्यांची खानदानी कुंडली घेऊनच कोकणात वाढलोय, याचे भान ठेवूनच यापुढे त्यांनी ट्रोलगिरी चालवावी.

आणि जी काय ट्रोलगिरी करायची असेल, ती माझी लेखमाला संपल्यावर! वन टू वन आणि खऱ्या नावाने!! भेटूच…..

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!!!

येतोय… उद्यापासून!!!

सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तथा कामगार दिनाच्या शुभेच्छा!! जय महाराष्ट्र!!

*—–अविनाश पराडकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − one =