You are currently viewing आंगणेवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहीर सभा

आंगणेवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहीर सभा

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते व्यासपीठाचे भूमिपूजन; भाजपाकडून जोरदार तयारी

 

मालवण / मसुरे :

आंगणेवाडी येथील भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ आणि ५ फेब्रुवारीला साजरी होत आहे. यंदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंगणेवाडी यात्रेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आंगणेवाडी नजिक भोगलेवाडीच्या माळरानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी या व्यासपीठाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. या सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सिंधुदुर्गात येत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. ४ फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी यात्रेत भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर आंगणेवाडी पासून थोड्याच अंतरावर असलेल्या भोगलेवाडी माळरानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेसाठी राज्यातील भाजपाचे दिग्गज मंत्री तसेच अनेक आमदार, खासदार, मुंबई ठाण्यासह राज्यातील आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचांसह काही पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते. या जाहीर सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम भोगलेवाडीच्या माळरानावर हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी तब्बल २०० कामगार कार्यरत आहेत. ही जाहीर सभा भव्य दिव्य करण्यासाठी भाजपाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी कामास लागले आहेत. दरम्यान भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते या व्यासपीठ उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोहिते, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी बाळा आंगणे, महेश बागवे, राकेश नेमळेकर तसेच अन्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा