You are currently viewing मालवणातील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु

मालवणातील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु

आ. वैभव नाईक यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कामाची केली पाहणी

तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य

 

मालवण :

मालवण शहराचे पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील आरसे महल या इमारतीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे दोन कोटी रूपये मंजूर असून नवीन इमारत लवकरच उभी राहणार आहे. तसेच जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचेही नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आवश्यक असे सहकार्य केले होते. आताचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा प्रस्ताव मंजूर करत आवश्यक असणारा निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

आमदार नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी नूतनीकरण करण्यात येणाऱ्या मालवण येथील शासकीय विश्रामगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरसे महल या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी सातत्याने आमदार वैभव नाईक यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्यातून आरसे महल या इमारतीसाठी सुमारे दोन कोटी निधी उपलब्ध झाला असून लवकरच कामालाही सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचेही नूतनीकरण झाल्यास त्याही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांनाही त्याचा फायदा होणार आहे. सध्या मालवणात येणाऱ्या अधिकारी, मंत्री अगर आमदार खासदार यांना खासगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे.याकडे आ. वैभव नाईक यांनी विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष वेधले होते.या नूतनीकरणाच्या कामासाठी त्यांनी सुमारे ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

*इमारतीत बदल न करता होणार नूतनीकरण !*

अस्तित्वात असलेले शासकीय सध्या विश्रामगृह यामध्ये कोणताही बदल न करता त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सीआरझेडच्या नियमांचाही फटका याला बसणार नाही. आहे त्याच ठिकाणी आणि आहे त्याच परिस्थितीत फक्त नूतनीकरण होणार आहे. जेणेकरून त्याचा फायदा अधिकारीव लोकप्रतिनिधींना होऊ शकणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी याठिकाणी सुसज्ज अशी शासकीय विश्रामगृह कार्यरत आहेत. फक्त मालवणातील विश्रामगृह हे असुविधांचे बनले होते. यामुळे आता आरसे महल याठिकाणी नवीन इमारत आणि जुन्या विश्रामगृहाच्या ठिकाणी नूतनीकरणाची इमारत उभी राहणार असल्याने मालवणात येणाऱ्या मंत्री आणि आमदार यांना आता शासकीय विश्रामगृह याठिकाणी थांबण्यास मिळणार आहे, असेही आ. वैभव नाईक म्हणाले.

*पंचायत समितीचेही विश्रामगृह सुसज्ज बनविणार!*

मालवण पंचायत समितीचे विश्रामगृह बंदरजेटी परिसरात असल्याने त्याठिकाणी ही सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी सीआरझेडचा फटका बसत आहे. मात्र, शासकीय इमारत उभी करण्यासाठी सीआरझेडमध्ये काही प्रमाणात सुट मिळविता येऊ शकते याचा अभ्यास करून एक परिपूर्ण आराखडा बनवून पंचायत समितीचेही विश्रामगृह सुसज्ज बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. दोन्ही विश्रामगृहातील काही कक्ष जर पर्यटनासाठी थेट वापरण्यास शासनाने परवानगी दिल्यास त्याचा फायदा विश्रामगृहाचे व्यवस्थापन सांभळण्यासाठी होऊ शकणार आहे. याकडे आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्यांचेहीआमदार नाईक म्हणाले.

*कार्यकारी अभियंत्यांचे काम चांगले!*
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सदरच्या प्रस्तावासाठी आवश्यक पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यासाठी लक्ष दिला आहे. यापूर्वीच शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता चांगल्याप्रकारे काम करीत असून त्यांच्या नियोजनामुळेच लवकरच मालवणातील शासकीय विश्रामगृह आणि आरसे महल या दोन्ही इमारती दिमाखात उभ्या राहणार आहेत, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा