You are currently viewing वैभववाडी पोस्ट कार्यालयात अपूरा कर्मचारी वर्ग- ग्राहकांची गैरसोय दूर करावी….

वैभववाडी पोस्ट कार्यालयात अपूरा कर्मचारी वर्ग- ग्राहकांची गैरसोय दूर करावी….

ग्राहक पंचायत महाराष्ट्रची मागणी.

वैभववाडी
वैभववाडी तालुका पोस्ट कार्यालयात गेले काही महिने पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेकडे तसेच वैभववाडी तालुका शाखेकडे आलेल्या आहेत. पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा. डाक अधीक्षक, पोस्ट आॉफीस ओरस, सिंधुदुर्ग यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. मुळात अपुरा कर्मचारी पुरवठा असताना येथील कर्मचारी दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये पाठवले जातात. याबाबत आम्ही आपल्या कार्यालयाची पत्रव्यवहार करून पुरेसा कर्मचारी पुरवठा करावा व ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी विनंती केलेली आहे. तसेच आठ दिवसापूर्वी फोनवरून येथील वस्तुस्थितीची कल्पना दिली होती. दोन-तीन दिवस बदलीवर पाठवलेला कर्मचारी आजच हजर झाल्याचे समजते. वैभववाडी हे तालुक्याचे ठिकाण असून येथील ग्राहकांना विचार करता पुरेसा कर्मचारी वर्ग अपेक्षित असताना आपण याकडे दुर्लक्ष करीत आहात. वैभववाडी पोस्ट कार्यालयात पुरेसा व नियमित कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने येथील सर्वसामान्य ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी विनंती करीत आहोत.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाज शरणवृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत.
सदर विनंती अर्ज मेलद्वारे पाठवला असून या मेलची प्रत मा. जनरल पोस्टमास्तर, डिव्हिजन गोवा यांना पाठवली आहे. आम्ही केलेल्या विनंती अर्जावर योग्य कार्यवाही करावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाहीबाबत पत्रोत्तर व्हावे, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर, वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 5 =