You are currently viewing गाबीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद – परशुराम उपरकर 

गाबीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद – परशुराम उपरकर 

गाबीत बांधवाना एकत्र आणण्याबरोबर संस्कृतीचे दर्शन घडविणार

मालवण

दांडी येथे २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या गाबीत महोत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यात गावागावात व वाडीवाडीत गाबीत समाज बांधवांच्या बैठका घेण्यात आल्या. सर्वांनी एकत्र येऊन हा महोत्सव यशस्वी करण्याचे ठरविले आहे. हा महोत्सव केवळ करमणुकीपुरता मर्यादित न राहता विखूरलेल्या गाबीत बांधवाना एकत्र आणून गाबीत समाजाचा इतिहास मांडण्याबरोबरच गाबीत लोककला, उत्सव, खेळ व गाबीत संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गाबीत बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, रोजगार व व्यवसायच्या कक्षा रुंदावण्यासाठी देखील प्रयत्न या महोत्सवातून करण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
फोवकांडा पिंपळ येथील गाबीत महोत्सव कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी गाबीत समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सचिव महेंद्र पराडकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, महोत्सव स्थानिक समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, छोटू सावजी, सहदेव बापर्डेकर, राजा गावकर, पूजा सरकारे, बाबी जोगी, नारायण धुरी, सन्मेष परब, रुपेश खोबरेकर, अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, सुरभी लोणे, भाऊ मोरजे, रश्मीन रोगे, विकी चोपडेकर आदी उपस्थित होते.
श्री. उपरकर म्हणाले, प्रथमच होत असलेल्या गाबीत महोत्सवासाठी जिल्हाभरातील गाबीत बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावागावात होणाऱ्या बैठकांना गाबीत बांधवांची मोठी उपस्थिती लाभत आहे. मुंबई, पुणे येथील गाबीत समाजाच्या शाखांमार्फत घेण्यात आलेल्या बैठकांना देखील तेथील गाबीत बांधवांचा चांगला प्रतिसाद लाभून महोत्सवासाठी त्यांचेही सहकार्य लाभत आहे. महोत्सवात होणाऱ्या चित्रकला, निबंध, नौकानयन, जलतरण आदी स्पर्धासाठी मोठ्या प्रमाणावर नावनोंदणी होत आहे. महोत्सवासाठी विविध समित्या गठीत केल्या असून या महोत्सवाची मुख्य जबाबदारी पाहणाऱ्या स्थानिक समितीच्या अध्यक्षपदी अन्वय प्रभू यांची निवड करण्यात आली आहे.
गाबीत महोत्सव केवळ करमणुकीपुरता न राहता या महोत्सवातून अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत. महोत्सवातून सिंधुदुर्ग रत्नागिरीसह मुंबई, पुणे, गुजरात, गोवा, कर्नाटक येथील विखूरलेल्या गाबीत बांधवाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गाबीत समाजातील आजच्या तरुण पिढीला गाबीत समाजाचा इतिहास फारसा माहित नाही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असलेला गाबीत समाजाचा इतिहास या महोत्सवातून समोर आणण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यादृष्टीने महोत्सवात प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. तसेच गाबीत समाजाचा इतिहास व समाजाविषयी माहिती असणारे पुस्तकही महोत्सवापूर्वी प्रकाशित करण्यात येणार आहे. गाबीत समाजातील मच्छिमारीच्या विविध पारंपरिक पद्धती तरुण पिढी व पर्यटकांना दाखविण्यासाठी पारंपरिक मच्छिमारीच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. गाबीत समाजाचा मच्छिमारी हा मुख्य व्यवसाय असल्याने मत्स्य व्यवसाय खात्यातील विविध नोकरीच्या संधीची माहिती व्हावी यासाठी मत्स्य अधिकाऱ्यांना आमंत्रीत करून त्यांचा संवाद कार्यक्रमही होणार आहे. किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसाय विकसित करण्यात गाबीत समाजच अग्रेसर असल्याने पर्यटन व्यवसाय विषयक मार्गदर्शनही या महोत्सवात करण्यात येणार आहे. आज गाबीत समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत, त्यांना गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. गोवा व कर्नाटक येथील गाबीत समाजाचे आमदार, मंत्री यांनाही या महोत्सवास निमंत्रित करण्यात येणार आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता संस्कार हॉल, धुरीवाडा येथे जिल्हा बैठक होऊन महोत्सवाची अंतिम रूपरेषा जाहीर करण्यात येईल, असे उपरकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा