सप्टेंबरचा पाऊस तुफान कोसळतोय….

सप्टेंबरचा पाऊस तुफान कोसळतोय….

संपादकीय……

गणेश चतुर्थीनंतर पाऊस थोडीशी विश्रांती घेतो, सराईच्या दिवसात भात कापणीस वेग येतो… परंतु यावर्षी गणपती बाप्पा थोडेसे आधीच विराजमान झाले,,, निरोप घेऊन विसर्जीतही झाले. नवरात्रोत्सवाच्या धामधुमीस थोडासा अवकाश असतानाच वेळ साधली ती पर्जन्य राजाने…..!
काल रात्रीपासून सावंतवाडीत कोसळत असलेला तुफानी पाऊस आपलं अक्राळविक्राळ रूप दाखवीत आहे. जिथे तिथे सिमेंटची जंगले उभी राहत असताना निसर्ग निर्मित पाण्यास अडथळे निर्माण होत असताना, आणि सावंतवाडीत नाले सफाई, स्वच्छतेचे बारा वाजले असतानाच पावसाच्या पडणाऱ्या पाण्याच्या प्रचंड लोटाने गटारात उतरून पाहिलं, परंतु जाण्यास वाट नसल्याने नाविलाजने का होईना रस्त्यावर वाहणे पसंत केलं.
सावंतवाडीतून शिरोड्याकडे जाणाऱ्या सालईवाडा येथील हमरस्त्यावर तर डोंगराच्या कुशीतून येणाऱ्या पावसाच्या लोटाने नदीचे स्वरूप प्राप्त केले आहे, त्यामुळे सखल भागात असणाऱ्या घरांमध्ये पाण्याचे लोट शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्य बाजारपेठेत तर जयप्रकाश चौक ते मासळी मार्केट तिठा परिसरात ढोपरभर पाणी साचल्याने नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष जनसुविधांकडे आहे की स्वहित जपण्याकडे याचा प्रत्यय आणून देत आहे. भर बाजारपेठेतून वाहणाऱ्या पाण्यामुळे नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे स्वच्छता राखा असा नारा देताना बाजारपेठेत स्वच्छतेचे तीन तेरा झालेले पहायला मिळत आहेत. अति पाऊस असला तरी सावंतवाडीत पाणी तुंबण्याचे प्रकार क्वचितच घडतात, परंतु स्वतःमधील हेवेदावे सांभाळण्यात व्यस्त असणाऱ्या नगराध्यक्षांसहित सर्व टीमला चिंतन करण्याची वेळ पावसाने आणून दिलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा